[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांना आता गारेगार रेल्वे प्रवास करता येणार आहे. नवी मु्ंबईतील पहिली मेट्रो (Navi Mumbai Metro) चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्ग क्र. 1 वर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी 21 जून 2023 रोजी सुरक्षा प्रमाणपत्र सिडकोला दिले आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत, नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकूण ४ उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ च्या अंमलबजावणीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले. सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अंमलबजावणीसाठी सिडकोला आयसीआयसीआय बँकेकडून 500 कोटींचे वित्त पुरवठा प्राप्त झाला आहे. तसेच सिडकोच्या 2022-23 या वर्षीच्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पाकरिता समर्पित जमीन वाटपित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाचे चलनीकरण होऊन प्रकल्पासाठी वित्त पुरवठा सुकर होणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये मार्ग क्र. 1 वरील पेंधर ते सेंट्रल पार्क या 5 स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. आता मार्ग क्र. 1 वरील बेलापूर ते पेंधर स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे लवकरच संपूर्ण मार्ग क्र. 1 प्रवासी वाहतुकीकरिता कार्यान्वित होणार आहे.
नवी मुंबई मेट्रो लाईन 1 च्या यशस्वी परिचालनासाठी सिडको सज्ज आहे. परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे. नवी मुंबई मेट्रोच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा सर झाला आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबईकरांकरिता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अनेक अडीअडचणींवर मात करून बहुप्रतीक्षित अशी नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे, असे सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी म्हटले.
1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. आता 12 वर्षानंतर नवी मुंबईकरांची मेट्रोची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे.
[ad_2]