( प्रगत भारत । pragatbharat.com)
Titan Submarine: अटलांटिक महासागरात 1912 रोजी बुडालेल्या टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडी (Titan Submarine) बुडालेल्या 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ माजली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत ज्या पाच लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यात उद्योगपती स्टॉकटन रश यांचाही समावेश आहे. दरम्यान, आता यासंबंधी लास वेगासमध्ये राहणारे उद्योजक जय ब्लूम यांनी एक मोठा खुलासा केला आहे. स्टॉकटन रश यांनी एक वर्षापूर्वी जय ब्लूम आणि त्यांचा मुलगा सीन ब्लूम यांना दुर्घटनाग्रस्त टायटन पाणबुडीमधून प्रवास करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी त्यांनी त्यांना कमी दरात तिकीटही देऊ केलं होतं.
सुरक्षेवरुन जय ब्लूम यांना होती चिंता
रश यांनी ब्लूम यांना खोल समुद्रात जाऊन या रोमांचकारी प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे तसंच टायटॅनिकचे अवशेष पाहिले पाहिजेच असं सांगत मनवण्याचा प्रयत्न केला होता. ब्लूम यांनी एका मुलाखतीत खुलासा आहे की, त्यांचा मुलगा जो सध्या 20 वर्षांचा आहे त्याला लहानपणापासूनच टायटॅनिक जहाजाबद्दल फार उत्सुकता होती. पण जेव्हा ब्लूम यांनी टायटन पाणबुडीसंबंधी वाचण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र त्यांच्या चिंतेत भर पडली आणि त्यांना सुरक्षेची चिंता सतावू लागली. त्यामुळे त्यांनी नम्रपणे या प्रवासाचा भाग होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
ब्लूम यांच्या जागी गेले पाकिस्तानी पिता-पुत्र
ब्लूम यांनी सांगितलं की, यानंतर पाणबुडीत उपलब्ध असणाऱ्या दोन जागा पाकिस्तानी वंशाचे शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान यांना मिळाली, ज्यांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला. ब्लूम यांना दोन आठवड्यापूर्वीच एका दुचाकी अपघातात आपला खास मित्र ट्रीट विलियम्सला गमावलं होतं. त्यात आता रस यांचाही मृत्यू झाला. ब्लूम सांगतात की, “जेव्हा कधी मी पाकिस्तानी व्यावसायिक आणि त्यांच्या 19 वर्षीय मुलाचा फोटो पाहतो तेव्हा असं वाटतं की, किती सहजपणे या ठिकाणी माझा आणि माझ्या 20 मुलाचा फोटो असता. पण देवाच्या कृपेने मी तिथे जाऊ शकलो नाही”.
ब्लूम का गेले नाहीत?
गुरुवारी अमेरिकेने टायटन पाणबुडीचे अवशेष सापडल्याची घोषणा केली. यानंतर ब्लूम यांनी आपल्यात आणि रश यांच्यात फेसबुकवर झालेले संवाद शेअर केले होते. यामध्ये त्यांनी हा प्रवास फारच धोकादायक असल्याचं सांगितलं होतं. पण रश यांनी मात्र हा दावा फेटाळला होता.
एका मेसेजमध्ये स्टॉकटन रश यांनी लिहिलं होतं की, यामध्ये धोका तर आहे. पण हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणं आणि स्कुबा डायव्हिंगच्या तुलनेत मात्र कमी आहे.
ब्लूम यांच्याकडे खासगी हेलिकॉप्टरचा परवाना आहे. मात्र त्यांना पाणडुबीतून प्रवास करण्यावर शंका होती. आपातकालीन स्थितीत टायटन पाणडुबीला आतून उघडू शकत नाही ही गोष्ट त्यांना सतावत होती. जितकं अधिक मला माहिती मिळाली तितकी माझी चिंता वाढली असं ते म्हणतात.