[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra’s Contribution to Chandrayaan-3 : भारताच्या महत्त्वाकांक्षी अशा तिसऱ्या चंद्र मोहिमेला (ISRO Lunar Mission) सुरुवात झाली आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) शुक्रवारी यशस्वीपणे अवकाशात झेपावलं, त्यानंतर आता त्याचा चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास सुरु झाला आहे. देशासह संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या ‘मिशन मून’ (Mission Moon) कडे लागलं आहे. भारताच्या चंद्र मोहिमेत महाराष्ट्राचंही योगदान आहे. चांद्रयान-3 चा महत्त्वाचे भाग मुंबईतील गोदरेज एअरोस्पेसमध्ये बनवण्यात आले आहेत, तसेच बुलढाणा येथील चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर चांद्रयान-3 मध्ये करण्यात आला आहे. तर पुण्याच्या जुन्नरमधील दोन सुपुत्रांनी चांद्रयान मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. चांद्रयान-3 मोहिमेमध्ये महाराष्ट्राचं काय योगदान आहे, जाणून घ्या.
मुंबईतील गोदरेज एरोस्पेसकडून इंजिनाचे महत्त्वाचे भाग
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यानासाठी गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीनं इस्रोला इंजिनासह काही महत्त्वपूर्ण भाग पुरवले आहेत. इंजिनासाठीचे हे महत्त्वाचे भाग गोदरेजच्या मुंबईतल्या विक्रोळी प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहेत. गोदरेज कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल या भागांसह इंजिनचे काही भाग पुरविले आहेत. गोदरेज एरोस्पेसने या योगदानांसह चांद्रयान आणि मंगळयान यांसारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गोदरोज एरोस्पेसचे बिझनेस हेड मानेक बेहरामकामदीन यांनी इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेतील आमच्या योगदानाचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटत असल्याचं सांगितलं.
पाहा व्हिडीओ : चांद्रयान 3 साठी गोदरेज एरोस्पेसने पुरवले महत्त्वाचे भाग
बुलढाण्यातील खामगावच्या चांदीचा वापर
देशासाठी महत्त्वाकांक्षी आणि अभिमानास्पद असलेली चांद्रयान-3 या मोहिमेत राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दोन वस्तूंचा खारीचा वाटा आहे. खामगाव येथील प्रसिद्ध असलेली चांदी आणि खामगाव येथीलच प्रसिद्ध असलेली फॅब्रिक्स चांद्रयान-3 मोहिमेत वापरण्यात आलं आहे. त्यामुळे आता खामगावसह राज्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. खामगाव येथील चांदी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. चांदी ही वजनाने हलकी असल्याने चांद्रयान-3 मध्ये याचा वापर करण्यात आला आहे. खामगावची चांदी ही शुद्ध असल्याने चांद्रयान-3 साठीच्या स्टर्लिंग ट्यूबमध्ये ही चांदी वापरण्यात आली आहे.
खामगावच्या थर्मल फॅब्रिकचाही वापर
खामगाव येथीलच विक्रमशी फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चांद्रयान-3 साठी लागणाऱ्या थर्मल शील्ड पुरवलं आहे. चांद्रयानाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिक खामगाव येथील भिकमची फॅब्रिक्सने तयार केला आहे. याचा वापर चांद्रयान-3 मोहिमेत करण्यात आला आहे.
पुण्यातील दोन सुपुत्रांची महत्त्वाची कामगिरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दोन सुपुत्रांनी महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या मोहिमेत असिफभाई महालदार आणि मयुरेश शेटे यांचं योगदान आहे. असिफभाई महालदार हे रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीत आहे तर मयुरेश शेटे हे इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. राजुरी गावातील मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ आहेत. या चांद्रयान मोहिमेत मोठा सहभाग आहेत. सिनियर सायंटिस्ट म्हणून शेटे काम पाहतात. त्यांनीदेखील मोठी मेहनत करत चांद्रयान-3 या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांचे वडिल राजुरीत प्राचार्य आहेत आणि मयुरेश यांचं प्राथमिक शिक्षण राजुरीतील शिक्षण विद्या विकास मंदिर येथे झालं आहे.
असिफभाई महालदार हे उद्योजक आहे. त्यांची रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला या मोहिमेसाठी सहा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते मुळचे जुन्नर तालुक्यातील राजुरीत राहतात. चंद्रयान मोहिमेदरम्यान काही धोका झाला तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात ठेवावी लागते. ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीने पुरवली होती. श्रीहरिकोटा येथे ही यंत्रणा स्थापित करण्यात आली होती.
इंदापूरच्या वालचंदनगर कंपनीचा चांद्रयान-3 मध्ये मोलाचा वाटा
चांद्रयान-3 मोहिमेमध्ये पुण्याच्या इंदापूरमधील वालचंदनगर कंपनीला मोलाचा वाटा आहे. चांद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेले चार बूस्टर वालचंदरनगर कंपनीने तयार केले आहेत. या बूस्टरमध्ये घनस्वरुपात इंधन भरले जाते. मोहिमेच्या पहिल्या स्टेजसाठी याचा उपयोग होतो. यामध्ये हेड एन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक या महत्त्वाच्या उपकरणांचा समावेश आहे. चार वर्षापूर्वी 2019 च्या चांद्रयान-2 मोहिमेमध्ये ही वालचंदनगर कंपनीने मोलाची कामगिरी केली होती. चांद्रयान-2 साठी सहा बूस्टर तयार करण्याचं काम वालचंदनगर कंपनीने केलं होतं. तसेच मंगळयान मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचे योगदान होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वालचंदनगर कंपनीचा देश उभारणीच्या कामामध्ये मोलाचा अग्रणी सहभाग आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]