[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनाकडून निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र दहा दिवसाच्या आतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार अर्ज भरण्याची शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 ही अंतिम तारीख होती. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.
राजकीय पक्ष त्यासोबत विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रम निवडणुकांचा जाहीर झाल्यानंतर त्यानुसार रणनीती आखून तयारी सुद्धा केली आहे. मात्र सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थगितीचे कारण गुलदस्त्यात?
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र, हा निर्णय का घेतला, याची माहिती परिपत्रकात दिली नाही. त्याशिवाय, माध्यमांनाही सांगितले नाही. त्यामुळे या निर्णयावरून चर्चांना उधाण आले आहे.
विद्यार्थी-युवक संघटनांची टीका
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक असल्याची टीका ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केली आहे. अखेर राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले त्याचा आम्ही युवासेना तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांच्या युवा आघाडी आणि विद्यार्थी आघाडीची तयारी नसल्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये आपला पराभव हा निश्चित होणार आहे हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला असल्याचा आरोप छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी केला आहे.
असा होता निवडणुकीचा कार्यक्रम
ही निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. तर उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया 21 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली. तर 28 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिनेट निवडणुकीसाठी मतदान आणि 13 सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार होता.
[ad_2]