[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gulam Nabi Azad On Muslim: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी इस्लाम (Islam) धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. हिंदू (Hindu) धर्म इस्लाम धर्मापेक्षा खूप जुना असल्याचं गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) म्हणाले. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, मुघल सैन्याचा भाग म्हणून फक्त 10 ते 20 मुस्लिम भारतात आले होते आणि त्यानंतर बाकीचे धर्मांतरित झाले, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
गुलाम नबी गेल्या काही दिवसांपासून डोडा जिल्ह्याच्या 10 दिवसांच्या दौऱ्यावर होते. 9 ऑगस्ट रोजी डोडा येथील थाथरी भागात एका सभेत त्यांनी हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) धर्मावर वक्तव्य केलं आहे. गुलाम नबी आझाद यांच्या हिंदू धर्मावरील वक्तव्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
‘सर्वांचा जन्म हिंदू धर्मात झाला’
सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात गुलाम नबी आझाद म्हणतायत की, प्रत्येकाचा जन्म हा हिंदू धर्मात झाला आहे. संसदेत अनेक गोष्टी मी सांगितल्या, पण त्यातील तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, असं म्हणत त्यांनी संसदेतील प्रसंग सांगितला. गुलाम नबी म्हणाले, भारतात बाहेरुन लोक आल्याचं एका नेत्याने संसदेत सांगितलं.
त्यावर गुलाम नबी म्हणाले, कोणीही भारतात बाहेरून आलेलं नाही. सर्वजण हे मूळचे भारताचे आहेत. इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला, परंतु हिंदू धर्म फार जुना आहे. भारतात मुघल सैन्यातील 10 ते 20 जण बाहेरुन आलेले असावे. बाकीचे सर्व मुसलमान हे भारतातीलच आहेत, ज्यांनी नंतर धर्मांतर केलं आणि हिंदू धर्म सोडून मुस्लिम (Muslim) धर्म स्वीकारला. याचं उत्तम उदाहरण आपल्या काश्मीरमध्ये देखील असल्याचं गुलाम नबी म्हणाले. 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये जे होते ते सर्व काश्मिरी पंडित होते. नंतर सगळे धर्मांतरित होऊन मुसलमान झाले. त्यामुळे प्रत्येकाचा जन्म या (हिंदू) धर्मात झाला आहे.
मागील वर्षी काँग्रेसपासून वेगळे झाले आझाद
आझाद यांनी गेल्या वर्षी काँग्रेसपासून (Congress) फारकत घेतली होती. 73 वर्षीय गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी 50 वर्षं काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 26 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी आपला डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष सुरू केला. काँग्रेसपासून फारकत घेण्याचं कारण देताना ते म्हणाले होते की, 2013 मध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसचं उपाध्यक्षपद स्वीकारले तेव्हा त्यांनी संपूर्ण समुपदेशन यंत्रणा (Counseling system) उद्ध्वस्त केली होती. पक्षातील सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला केलं गेलं आहे आणि अनुभव नसलेल्या गुंडांची नवीन टोळी पक्षाचा कारभार चालवू लागल्याचा दावाही आझाद यांनी केला आहे.
हेही वाचा:
Mallikarjun Kharge: सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या आग्रहामुळे काँग्रेस अध्यक्षपद; मल्लिकार्जुन खर्गेंचा गौप्यस्फोट
[ad_2]