( प्रगत भारत । pragatbharat.com)
दिल्लीत सरकारी अधिकाऱ्याने 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत तिला गर्भवती केलेल्या प्रकरणी आता नवी घडामोड समोर आली आहे. पीडित मुलीने अधिकाऱ्याच्या मुलासह इतर कोणावरही आरोप केले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली आहे. याचं कारण पोलिसांना आरोपी अधिकाऱ्याचा मुलगाही या बलात्कारात सहभागी असल्याचा संशय होता. पण पीडित मुलीने अधिकारी आणि त्याची पत्नी वगळता इतर कोणावरही आरोप केलेले नाहीत.
आरोपी प्रेमोदय खाखा हा दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागात अधिकारी असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याप्रकरणी 21 ऑगस्टला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2021 या कार्यकाळात अधिकाऱ्याने मुलीवर बलात्कार केला. तसंच तिला गर्भवतीही केलं होतं. मुलीने आरोपीच्या पत्नीकडे तक्रार करत मदत मागितली असता तिने पतीचं कृत्य लपवण्यासाठी मुलीला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या. पोलिसांनी आरोपीची पत्नी सीमा राणीलाही अटक केली आहे.
याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस प्रेमोदय खाखा याचा मुलगाही या गुन्ह्यात सहभागी होता का याचा तपास करतर होता. पण दिल्ली पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. दरम्यान, पीडित मुलीने दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या लेखी जबाबात प्रेमोदय खाखाच्या मुलावर कोणताही आरोप केलेला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर सिंग कालसी यांनी दिली आहे.
Delhi Rape: बलात्काराआधी मित्राच्या मुलीला रोज रात्री बेशुद्ध करायचा अन् त्यानंतर पत्नी…, पोलिसांचे धक्कादायक खुलासे
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमोदय खाखा आणि सीमा राणी हे या गुन्ह्यात सक्रीयपणे सहभागी होते आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.
आरोपी प्रेमोदय खाखा हा पीडित मुलीच्या वडिलांचा चांगला मित्र होता. त्याने मुलीचं पालकत्व स्वीकारलं होतं. वडिलांच्या निधनानंतर मुलगी आरोपीच्या घरी येऊन राहू लागली होती. त्याने मुलीच्या आईला आपण तिची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं होतं. पण याउलट त्याने तिच्यावर हात टाकत बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2020 रोजी पहिल्यांदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. वडिलांच्या निधनाचा मुलीला फार मोठा धक्का बसला होता. यानंतर तिच्या आईने तिला आरोपी अधिकाऱ्याच्या घरी वास्तव्यास पाठवलं होतं. यानंतर काही दिवसातच आरोपीने हे कृत्य केलं होतं.
विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी आरोपीच्या मुलाच्या सहभागाच्या दृष्टीने तपास करण्यासंबंधीचं वृत्त फेटाळलं आहे. “हे बरोबर नाही. तपासादरम्यान काही आरोप किंवा घटक आढळल्यास आम्ही तपास करू,” असे दीपेंद्र पाठक म्हणाले.
सोमवारी, दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि बलात्कार पीडितेची ओळख जाही होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं. तसंच इतर पुरुषांकडूनही तिच्यावर अत्याचार झाला का, अशी विचारणा केली. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने इतर लोकांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या मुलीच्या विधानावर काय कारवाई केली, अशी विचारणा पोलिसांना केली. पोलिसांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने तपास केला जाईल असं सांगितलं आहे.
दरम्यान आरोपी प्रेमोदय खाखा यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर सीमा राणीचीही 14 दिवसांसाठी जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.