( प्रगत भारत । pragatbharat.com)
Neighbour Fight In USA: तुमच्या घरात राहणाऱ्या सर्वांचे केस अचानक गळू लागले तर किंवा अचानक सर्वांना उलट्यांचा, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला तर? जेवणात काही कमी जास्त होतंय का? नक्कीच आपल्यावर विषप्रयोग झालाय की काय? असे प्रश्न अशावेळी नक्कीच पडू शकतात. मात्र अमेरिकीतील एका कुटुंबाबरोबर ही जर तरची गोष्ट सत्यात अवतरली आहे. या कुटुंबाच्या शेजाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे घरातील सर्वांचे आणि खास करुन चिमुकल्या बाळाचे केस गळू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा शेजारी पीडित कुटुंब राहत असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या फटीमधून घरात विषारी रसायन असलेलं इंजेक्शन मारायचा असं घराबाहेर लावलेल्या कॅमेरांमधील फुटेजवरुन स्पष्ट झालं आहे.
पोलीस घेत आहेत शोध
फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या उमर अब्दुल्लाने केमिस्ट्रीमध्ये पीएचडीचं शिक्षण घेतलेल्या शुमींग ली या शेजाऱ्याविरोधात तक्रार केली आहे. शुमींग ली त्याच्या कृत्यांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी खेळत होता, असा गंभीर आरोप उमरने केला आहे. 36 वर्षीय उमर अब्दुल्लाने ‘डेली मेल डॉट कॉम’ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या चिनी नागरिकाने मिथेनडन आणि हायड्रोडनसारखी घातक रसायनं इतर विषारी द्रव्यांबरोबर एकत्र करुन घरात इंजेक्शनच्या सहाय्याने सोडायचा. ही विषारी रसायनं नेमकी कोणती होती याचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत.
घराबाहेरील कुंडीत लावला कॅमेरा अन्…
शुमींग ली याला पकडण्यासाठी उमर अब्दुद्लाने घराबाहेरील कुंडीमध्ये एक छुपा कॅमेरा लावला. या कॅमेरामध्येच शुमींग ली इंजेक्शन घराच्या दारातून मारायचा हे कैद झालं आहे. 36 वर्षीय शुमींग ली हा रसायन संशोधक आहे. त्याला पोलिसांनी उमर अब्दुद्लाच्या तक्रारीनंतर अटक केली असून या कॅमेरामधील फुटेज आणि त्याच्याकडे सापडलेली रसायन पुरावा म्हणून वापरली जाणार आहेत.
उलट्या, डोकेदुखी अन् केस गळती
उमर अब्दुल्लाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबाला उलट्यांबरोबरच थकवा येणे आणि डोकेदुखीचा त्रास व्हायचा. तसेच मागील काही काळापासून घरातील सर्वच सदस्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळून पडत होते. जून महिन्यात तर उमर अब्दुल्लाच्या चिमुकल्या मुलीच्या उशीवर केसांचा बुचका सापडायचा असं त्याने सांगितलं. “आम्ही यासंदर्भात गुगल केलं असता लहान मुलांमध्ये नैसर्गिक केसगळती होत नाही असं समजलं. मात्र त्याचवेळी आमचेही केस मोठ्या प्रमाणात गळत असल्याचं आम्हाला जाणवलं. हे रसायनांमुळे होतंय याचा आमच्याकडे पुरावा नव्हता पण हेच मुख्य कारण असल्याचं आम्हाला वाटतं होतं,” असं उमर अब्दुल्ला म्हणाला.
आरोपी 2 मुलांचा बाप
उमर अब्दुल्लाने घराबाहेर लावलेल्या कॅमेरातील फुटेज पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. कारण त्यांचा शेजारी त्यांच्याबरोबर खेळीमेळीने राहत होता. तो असं करेल याची कधी कल्पनाही आपण केली नसल्याचं उमर अब्दुल्ला सांगतो. शुमींग लीला 2 मुलं आहेत. स्वत: शुमींग ली कधी मुलांबरोबर दिसला नसला तरी त्याची पत्नी मुलांना खेळायला घेऊन जाताना दिसायची असंही उमर अब्दुल्लाने सांगितलं.
तक्रारी येऊ लागल्या
उमर अब्दुल्ला आणि शुमींग लीच्या कुटुंबामध्ये ऑगस्ट 2022 पर्यंत चांगले संबंध होता. शुमींग लीने आपल्याला मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन केलं होतं असंही उमर अब्दुल्ला म्हणाला. मात्र रात्रीच्या उमर अब्दुल्लाच्या घरातून पावलांचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो. त्यामुळे रात्री सावकाश चालल्यास हा त्रास आम्हाला होणार नाही असं त्यावेळेस शुमींग लीने सांगितलं होतं. त्यानंतरही शुमींग ली अनेकदा उमर अब्दुल्लाला मेसेज करुन त्यांच्या घरातून येणाऱ्या आवाजांबद्दल तक्रार करायचा. यामध्ये टॉयलेट सीटच्या आवाजापासून फोन पडल्याच्या आवाजापर्यंत अनेक गोष्टींची तो तक्रार करायचा.
थेट पोलिसांत गेलं प्रकरण
मार्च महिन्यामध्ये यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उमर अब्दुल्ला हा शुमींग लीच्या घरी गेला असता त्याने थेट पोलिसांना फोन केला. शेजारी आपल्याला आवाज करुन त्रास देत असल्याचं उमर अब्दुल्लाने सांगितलं. याच आवाज येण्याचा राग डोक्यात ठेऊन शुमींग ली जून महिन्यापासून उमर अब्दुल्लाच्या घरात इंजेक्शनने विषारी रसायनं सोडू लागला.