[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी खोइरंटक भागात एका ग्रामसेवकाची सकाळी हत्या करण्यात आली. त्यानंतर हिंसाचाराला सुरूवात झाली. बुधवारी संध्याकाळपासून काही तासांच्या शांततेनंतर गोळीबाराची ताजी घटना घडली. तर, बुधवारच्या हिंसाचारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मिझोरममार्गे गुवाहाटी येथे नेत असताना मृत्यू झाला; तसेच हिंसाचारात जखमी झालेल्या अन्य एका व्यक्तीचा गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चुराचांदपूर जिल्ह्यातील रुग्णालयात मृत्यू झाला.
चिंगफेई भागात बुधवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पाचपैकी तिघांना चुराचांदपूरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बिष्णुपूरच्या नारायणसेना गावाजवळ मंगळवारी झालेल्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा त्याच्याच देशी बनावटीच्या बंदुकीतून तोंडावर गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, इंडिजिनियस ट्रायबल लीडर्स फोरम या संघटनेने तातडीने चुराचंदपूर बंदची हाक दिली आहे. पाणी आणि वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
‘सुरक्षा दलांनी कांगपोकपी, थौबल, चुराचांदपूर आणि इम्फाळच्या पश्चिम जिल्ह्यांच्या सीमा आणि संवेदनशील भागात शोध मोहीम राबवली. यावेळी पाच शस्त्रे, ३१ काडतुसे, १९ स्फोटके, आयईडी साहित्याची तीन पाकिटे जप्त करण्यात आले,’ असे मणिपूर पोलिसांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे; तसेच पोलिसांनी विविध जिल्ह्यांमध्ये १३० चौक्याही उभारल्या असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १,६४६ जणांना ताब्यात घेतले आहे.
मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित केल्यानंतर मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
[ad_2]