( प्रगत भारत । pragatbharat.com)
Landslides Cloudbursts Because People Eat Meat: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये कमांद येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थान म्हणजेच आयआयटीचे (IIT Mandi) निर्देशक प्राध्यापक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behera) यांनी एक विचित्र विधान केलं आहे. बेहरा यांनी हिमाचलमधील लोक जनावरांना मारुन त्यांचे मांस खात असल्यानेच नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागत असल्याचं म्हटलं आहे. मांस खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने नैसर्गिक आपत्ती आल्याचं बेहरा यांनी म्हटलं असून त्याच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नुकताच शूट केलेला व्हिडीओ
आयआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना बेहरा यांनी हे विधान केलं आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याची माहिती समोर आलेली नाही. मात्र तो सध्या व्हायरल होतोय हे मात्र नक्की. हा व्हिडीओ मागील महिन्याभरातील आहे हे निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. कारण मागील महिन्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्याप्रमाणात अतीवृष्टी झालेली आणि नद्यांना पूर आल्याने दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. सध्या मंडी आयआयटीने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
मुलांना शपथही दिली
बेहरा हे आयआयटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना मांसाहार करु नये असा सल्ला देतानाही दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीला उत्तम माणूस म्हणून समाजात वावरायचं असेल तर त्याने मांसाहार करता कामा नये असं बेहारा यांनी म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये बेहार विद्यार्थ्यांना मांसाहार न करण्याची शपथ देताना दिसत आहेत. प्राण्यांची शिकार करणं हे निसर्गाबरोबर खेळण्यासारखं असल्याचं बेहरा या व्हिडीओत सांगत आहेत. बेहरा एवढ्यावरच थांबले नाहीत तर प्राण्यांविरोधात होणारी क्रूरता वाढल्याने हिमाचलमध्ये ढगफूटी झाल्याचंही ते म्हणाले.
खासगी विचार असल्याची सरवासारव
या व्हिडीओसंदर्भात आयआयटी मंडीच्या मीडिया सेलला विचारण्यात आलं असता त्यांनी हे विधान नेमकं कोणत्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं याची कल्पना नसल्याचं सांगितलं. मांसाहार न करण्यासंदर्भात निर्देशकांनी मांडलेले विचार हे त्यांचे खासगी विचार असल्याचंही आयआयटीच्या मीडिया सेलने म्हटलं आहे.
‘मांसाहार करणारे वाढल्याने हिमालचमध्ये ढगफुटी झाली, दरडी कोसळल्या’; IIT Director चं विधान < येथे वाचा सविस्तर…#IITMandi #director #Bizarre #Logic #LaxmidharBehera #Landslide #cloudbursts #HimachalDisaster #Himachal #meat pic.twitter.com/wDweLg1a1f
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 8, 2023
यापूर्वी भूत पळवल्याचा दावा
बेहरा हे यापूर्वीही अशाच विधानांमुळे चर्चेत आलेले होते. बेहरा हे भगवान श्रीकृष्णाचे मोठे भक्त आहेत. आयआयटीचे निर्देशक म्हणून कार्यभार स्वीकारण्याआधीचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी आपल्या मित्राच्या घरातील भूत आपण पळवून लावल्याचा दावा केला होता. चेन्नईमधील मित्राच्या घरामधून आपण मंत्रोच्चारांच्या मदतीने भूत पळवल्याचा दावा त्यांनी केला होता. भूतं असतात असंही बेहरा म्हणाले होते.
आयआयटी रँगिंग प्रकरणामुळे चर्चेत
काही आठवड्यांपूर्वीच बेहरा निर्देशक असलेल्या या आयआयटी कॅम्पसमध्ये रँगिंगचं प्रकरण समोर आलं होतं. येथील 72 विद्यार्थ्यांवर रँगिंगचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली. 10 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. इतरांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला.