[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही उत्साह संचारलेला असतानाच पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या एका शिष्टमंडळाने दिल्लीत दाखल होत पक्षश्रेष्ठींकडे आपलं गाऱ्हाणं मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असल्याचे समजते. नाना पटोले यांनी चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे.नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात यावं, यासाठी पक्षातील एक गट गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय आहे. मात्र काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा पटोले यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे या असंतुष्ट गटाला अद्याप यश आलेलं नाही. काँग्रेसमधून ज्यांची नुकतीच हकालपट्टी करण्यात आली, त्या आशिष देशमुख यांनीही जाहीरपणे पत्र लिहीत पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अशातच काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांचाही संघर्ष झाला. वडेट्टीवार समर्थक देवतळे यांना नाना पटोले यांनी चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून काढून टाकलं. तेव्हापासूनच विजय वडेट्टीवार हे पटोलेंवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता वडेट्टवारांनी आक्रमक भूमिका घेत नाना पटोलेंना प्रदेशाध्यपदावरून हटवण्याची मागणी करत थेट दिल्ली गाठल्याचे समजते.
आम्ही काँग्रेसचे शिपाई, मला राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे; सोलापुरात नाना पटोलेंचं भाषण
मोदींच्या पाया का पडले? पापुआ न्यू गिनीच्या PM ने स्वत:च सांगितलं, वाचून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात हैं..!’
विजय वडेट्टीवार हे एकटेच पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत गेले नसून त्यांच्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील इतर काँग्रेस नेत्यांचे मोठे शिष्टमंडळ असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या शिष्टमंडळाच्या मागणीला प्रतिसाद देत खरंच नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात येते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत?
नाना पटोले यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोल्हापूरमधील काँग्रेस नेते सतेज पाटील, विदर्भातील सुनील केदार यांच्यासह यशोमती ठाकूर यांच्याकडे या पदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना काही महिने बाकी असतानाच काँग्रेसमध्ये सुरू झालेला हा अंतर्गत संघर्ष पुढे कोणत्या वळणावर जाऊन पोहोचतो, हे पाहावं लागेल.
[ad_2]