( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: भारतात सुरू असलेल्या जी-20 परिषदेचा (G-20 Summit) आज समारोप झाला. पुढील वर्षी जी-20 परिषद आता ब्राझीलमध्ये होणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी अध्यक्षपदाची जबाबदारीची सूत्रे ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डिसील्वा यांच्याकडे सोपवली.
पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वस्ति अस्तु विश्व’ या शांततेच्या प्रार्थनेसह परिषदेचा समारोप केला. त्यांनी म्हटले की, एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्याचा रोडमॅप आनंददायक असेल. 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडे G-20 चे अध्यक्षपद सोपवतो, असे पंतप्रधानांनी म्हटले.
व्हर्च्युअल सत्र आयोजित करण्याचा प्रस्ताव
पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोव्हेंबरपर्यंत जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. या दोन दिवसांत तुम्ही अनेक गोष्टी आणि प्रस्ताव मांडले आहेत. जे काही सूचना येतील ते स्वीकारण्याची आणि ते कसे ते पाहण्याची जबाबदारी आमची आहे. त्याबाबत काही होऊ शकते का? याचा विचार होईल. आपण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस G-20 चे दुसरे व्हर्च्युअल सत्र आयोजित करू. यामध्ये या परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ शकतो. या सर्व गोष्टींचा तपशील आमच्या टीमद्वारे शेअर केला जाईल. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण याच्याशी कनेक्ट व्हाल, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
ब्राझीलला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन
पीएम मोदींनी ट्विटरवर जी-20 बाबत पोस्ट करताना म्हटले की, “भारताने ब्राझीलला अध्यक्षपद सोपवले आहे. आम्हाला अढळ विश्वास आहे की ते समर्पण, दूरदृष्टीने नेतृत्व करतील आणि जागतिक एकता तसेच समृद्धी वाढवतील. भारताने आगामी G-20 चे अध्यक्षपद ब्राझीलला सोपवले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्राझीलला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिले.
India passes the gavel to Brazil.
We have unwavering faith that they will lead with dedication, vision and will further global unity as well as prosperity.
India assures all possible cooperation to Brazil during their upcoming G20 Presidency. @LulaOficial pic.twitter.com/twaN577XZv
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2023
ब्राझीलचे राष्ट्रपती झाले भावूक
दरम्यान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डिसील्वा यांनी म्हटले की, “जेव्हा आम्ही महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो तेव्हा मी खूप भावूक झालो. माझ्या राजकीय जीवनात महात्मा गांधींना खूप महत्त्व आहे. मी अनेक दशके माझ्या संघर्षाच्या काळात, कामगार चळवळीच्या दरम्यान अहिंसेचे पालन केले आहे. त्यामुळेच महात्मा गांधींना आदरांजली वाहताना मी भावूक झालो, असेही ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले.