[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : चिमण्या गणपती, मद्रासी गणपती, गुपचूप गणपती, (Ganeshotsav 2023) मोदी गणपती, माती गणपती ही नावं पुण्यातील गणपती मंदिरांची आहेत. पुण्यातील या गणपती मंदिरांच्या विचित्र नावांमागील इतिहास मोठा रंजक आहे. गणपती बाप्पाबद्दल भक्तांच्या मनात जशी भक्ती दाटून येते तशीच आपुलकीची भावनाही असते आणि त्यातूनच गणपतीला तो आपला मित्र असावा, या पद्धतीची नावे दिली जातात. पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरुन पुण्यातील या गणपतींचं नामकरण केल्याचं दिसतं.
चिमण्या गणपती
सदाशिव पेठेतील गणपतीच्या समोर त्या काळात चिमण्या मोठ्या प्रमाणात यायच्या म्हणून या गणपतीला सदाशिव पेठेतील लोकांनी चिमण्या गणपती, असं नाव दिलं आहे. आज हा परिसर लक्ष्मी रस्त्याला लागून असलेला अतिशय गजबजलेला परिसर बनला आहे. मात्र अनेकजण पत्ता सांगताता चिमण्या गणपती असा या मंदिराचा उल्लेख करतात.
मद्रासी गणपती
पुण्यातील रास्ता पेठेत पेशवेकाळात तामिळनाडूमधून तमिळ लोक येऊन स्थायिक झाले. मराठी संस्कृतीशी एकरुप होताना या तमिळ लोकांनी मराठी लोकांप्रमाणे गणपती मंदिर उभारले. दाक्षिणात्य स्थापत्य शैलीतील हे भव्य मंदिर आहे आणि तमिळ लोक त्यांच्या पद्धतीने पूजाअर्चा करतात आणि इथला गणपतीचा प्रसाद देखील मोदकाचा नाही तर दही भाताचा असतो.
मोदी गणपती
पेशव्यांकडे मोदी नावाचे दुभाषे होते. ते पेशव्यांसाठी इंग्रजी आणि मराठी भाषांतर करायचे. पेशव्यांकडून शनिवार पेठेतील जागा त्यांना इनाम देण्यात आली. त्या जागेवर उभारलेले मोदी गणपती हे खाजगी देवस्थान आहे. पुण्यातील नारायण पेठेत हे मंदिर आहे.
गुपचूप गणपती
गुपचूप नावाचे पेशव्यांचे सरदार होते. त्यांनी त्यांच्या वाड्यात उभारलेल्या मंदिरातील गणपती गुपचूप गणपती म्हणून ओळखला जातो. अजूनही या मंदिरात पेशवेकालीन वास्तुशैली जपण्यात आली आहे. लाकडी खांब, लाकडी तुळ्या आणि झुंबरे हे इथलं वैशिष्ट्य आहे.
माती गणपती
मंदिरातील गणपती एकतर धातूचे किंवा संगमरवर किंवा पाषाणातील मूर्तींचे असतात. गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती जरी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडूचे असतात. परंतु मंदिरात कायमस्वरुपी ठेवायच्या मूर्तींसाठी सहसा मातीचा वापर होत नाही. मात्र पुण्यातील नारायण पेठेतील गणपती हा पूर्णपणे मातीपासून तयार करुन तो मंदिरात स्थापन करण्यात आला. त्यामुळे या गणपतीला माती गणपती म्हणून ओळखलं जातं.
इतर महत्वाच्या बातम्या :
Pune Bamboo Market : जुन्या परंपरेला नव्या फॅशनची जोड; बुरुड आळीतील बांबूच्या मखराची पुणेकरांमध्ये क्रेझ
[ad_2]