( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : निपाह व्हायरस (Nipah Virus) मुळे आता देशाची चिंता वाढली आहे. दिवसागणिक निपाह व्हायरसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. केरळ (Kerala) च्या कोझिकोडमध्ये आणखी एक निपाह बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) ने निपाह व्हायरसबाबत चिंता व्यक्त केली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितलं की, निपाह विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
केरळमध्ये आणखी एक रुग्ण आढळला
डॉ. राजीव बहल यांनी 15 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितलं की, निपाह व्हायरसचा उद्रेक रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत केरळच्या कोझिकोडमधून निपाह व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. पहिल्या निपाह संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इतरांना त्याची लागण झाली. निपाह संक्रमित रुग्णांमध्ये मृत्यूदर जास्त आहे, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.
निपाह व्हायरसचा मृत्यू दर कोरोनाहून जास्त – ICMR
निपाह व्हायरसमुळे मृत्यूचा धोका अधिक आहे. कारण, याचा मृत्यूदर 40 ते 70 टक्के आहे. हा मृत्यूदर कोविडच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. कोविड रुग्णांचा मृत्यूदर 2 ते 3 टक्के होता. शुक्रवारी केरळमध्ये सहाव्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे निपाह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.