[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
17th September In History : आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. भारतीय सैन्यासमोर निजामाने शरणागती पत्करली. समाजसुधारक पेरियार रामसामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिन आहे.
जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day)
जागतिक स्तरावर 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यसेवा अधिक सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिपादन करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस सर्वात प्रथम 17 सप्टेंबर 2019 रोजी WHOने आपल्या ठरावावर साजरा करण्याची मान्यता दिली. 25 मे 2019 रोजी 72 व्या जागतिक आरोग्य संमेलनात हा ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हापासून दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस जागतिक रूग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.
1879 : पेरियार ई.व्ही. रामसामी यांचा जन्म
द्राविड चळवळीचे पुरस्कर्ते, समाज प्रबोधनकार पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी अर्थात पेरियार ई. व्ही. रामासामी यांचा आज जन्मदिन. पेरियार हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवणारे क्रांतीकारक म्हणून पेरियार यांची ओळख आहे. पेरियार यांच्या विचारांचा पगडा तामिळनाडूमध्ये आजही दिसून येतो.
पेरियार यांचा जन्म एका धार्मिक हिंदू कुटुंबात झाला होता. काशीमध्ये आलेल्या अपमानास्पद अनुभवानंतर त्यांनी रुढीवादी हिंदुत्वाचे कट्टर विरोधी झाले. त्यांनी जस्टीस पार्टीची स्थापना केली होती. 1944 मध्ये या पक्षाचे नाव द्रविड कनघम असे झाले.
पेरियार हे ब्राह्मणवादाचे मोठे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अस्पृश्यता, असमानता याला पाठबळ देणाऱ्या हिंदू धर्मग्रंथांची होळी केली होती. बालविवाह, देवदासी प्रथा, विधवा पुनर्विवाह यांच्या विरोधात असण्याबरोबरच ते महिला आणि दलितांच्या शोषणाच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांनी हिंदू जातीव्यवस्थेविरोधातही संघर्ष केला.
1885 : समाजसुधारक, पत्रकार, लेखक प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म
पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राचे पुढारी म्हणून महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणावर छाप सोडलेले केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा आज जन्मदिन. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. महात्मा फुले त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.
सामाजिक सुधारणांच्या मुद्यावर कोणतीही तडजोड केली नाही. बालविवाह, विधवांच्या केशवपनाची परंपरा, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, अस्पृश्यतेचा प्रश्न, हुंडाप्रथा आदी मुद्यांवर त्यांनी लढा दिला. त्यांच्याविरोधात पुण्यातील कट्टरतावाद्यांची त्यांची जिवंतपणी अंत्ययात्रा काढली होती. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो असे त्यांचे म्हणणे होते.
प्रबोधनकार ठाकरे हे राजर्षी शाहू महाराजाच्याही संपर्कात आले होते. शाहू महाराज हे स्वत: सुधारणावादी आणि परिवर्तन चळवळीचे नेतृत्व करणारे होते. प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली.
प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान दिले. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळसाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र होते.
1948 : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले
भारतीय लष्कराने सुरू निजाम संस्थानाच्याविरोधात सुरू केलेले ऑपरेशन पोलो आज पूर्णत्वास गेले. हैदराबादच्या निजामाने आज भारतासमोर शरणागती पत्करली. 15 ऑगस्ट 1947 नंतर निजामाने आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे घोषित केल्यामुळे भारत सरकार आणि हैदराबाद राज्यातील जनतेपुढे मोठा पेच व प्रश्न निर्माण झाला. हैदराबाद राज्याचा सत्ताधिश मुसलमान होता. परंतु राज्यात 88 टक्के हिंदू, 11 टक्के मुसलमान आणि एक टक्का इतर लोक होते. याशिवाय देशाच्या व दख्खनच्या मध्यभागी असलेले आणि देशात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे असलेले हैदराबाद राज्य स्वतंत्र राहणे राज्यातील जनतेच्याच नव्हे तर देशाच्याही हिताच्या विरोधात होते. हैदराबादचा निजाम हा पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी पडद्याआडून हालचाली करत होता.
तर, हैदराबाद राज्याच्या भारतातील विलीनीकरणाशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण प्राप्त होणार नव्हते. त्यामुळे राज्यातील जनतेने हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यासाठी सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले. भारतीयांच्या या आंदोलनाला चिरडण्यासाठी निजामाच्या फौजांनी, रझाकारांनी नागरिकांवर अत्याचार केले. अखेर भारतीय लष्कराने 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर कारवाई सुरू केली आणि चार दिवसात निजामाने शरणागती पत्करली.
1950 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म. नरेंद्र मोदी यांचा जन्म बॉम्बे प्रेसिडेन्सी राज्याच्या अखत्यारीत असलेल्या वडनगर येथे झाला. नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये सुरू झालेल्या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले. लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेत नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता. नरेंद्र मोदी हे त्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक जबाबदारी पार पाडत होते. 2001 मध्ये अनपेक्षितपणे त्यांची निवड गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून झाली. त्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द विविध मुद्यांवरील वादाने कायम चर्चेत राहिली. मात्र, भाजपने गुजरात राज्यावरील आपली पकड अधिकच मजबूत केली. पुढे 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सत्ता आल्यास मोदी पंतप्रधान होतील, अशी घोषणा केली. 2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवून विजयी झालेले मोदी हे पंतप्रधान झाले. अशी कामगिरी ते पहिले व्यक्ती ठरले. भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर 2019 मध्ये ही भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला बहुमत मिळाले.
इतर महत्त्वाच्या घटना :
1877: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन
1915: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म.
1929: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म.
1938: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म
1951: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.
1999: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन.
2002: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन
[ad_2]