[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अनंतनाग (काश्मीर) : काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये (Anantnag) आज (18 सप्टेंबर) सलग सहाव्या दिवशी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच राहिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भागात आतापर्यंतची ही सर्वात लांब चकमक असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन ठिकाणी चकमक झाली. यामध्ये कर्नल, मेजर आणि डीएसपी यांच्यासह 5 जवान शहीद झाले आहेत, तर लष्कराने अनंतनागमध्ये 1, बारामुल्लामध्ये 3 आणि राजौरीमध्ये 2 अशा सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गडुल कोकरनागच्या जंगलात आणखी दोन दहशतवादी लपल्याचा लष्कराला संशय आहे. अत्याधुनिक ड्रोन हेरॉन मार्क-2 च्या सहाय्याने त्यांची ठिकाणे शोधली जात आहेत.
जम्मू-काश्मीरमधील ही तिसरी सर्वात मोठी चकमक
यापूर्वी 2020 मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 18 तास चकमक झाली होती. त्याच वेळी, जम्मू-काश्मीरमधील ही तिसरी सर्वात मोठी चकमक आहे. यापूर्वी, जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात भाटी धार वन ऑपरेशन 9 दिवस चालले होते. 31 डिसेंबर 2008 रोजी सुरू झालेले ऑपरेशन 9 जानेवारी 2009 रोजी संपले होते. 2021 मध्ये जम्मूमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक झाली. पूंछ जिल्ह्यातील डेरा की गली आणि भिंबर गली दरम्यानच्या जंगलात 19 दिवस ही कारवाई सुरू होती.
किश्तवाडमध्ये तीन संशयित दहशतवाद्यांना अटक
सोमवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (PSA) अटक करण्यात आली आहे. तौसिफ-उल-नबी, जहूर-उल-हसन आणि रियाझ अहमद अशी त्यांची नावे आहेत. तिघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली.
सर्च ऑपरेशन सीआरपीएफ जवानाच्या पायाला लागली गोळी
दरम्यान, काल 17 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान सीआरपीएफ जवानाच्या पायाला चुकून गोळी लागली होती. मात्र, ही गोळी कोणाच्या रायफलमधून सोडण्यात आली हे अद्याप समजू शकलेलं नाही. 164 बीएन CRPF चे HC मनोज कुमार असे या जवानाचे नाव आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जवान रोड ओपनिंग पार्टीचा (आरओपी) भाग होता. त्याच वेळी, सैनिकांच्या तुकडीने 16 सप्टेंबर रोजी ठार झालेल्या दहशतवाद्याचा जळालेला मृतदेह बाहेर काढला होता.
लष्कराने प्रथमच अत्याधुनिक ड्रोन हेरॉन मार्क-2 चा वापर
16 सप्टेंबर रोजी, कोणत्याही दहशतवादी कारवाईत प्रथमच, लष्कराने कोकरनागमध्ये हल्ल्यासाठी सर्वात प्रगत ड्रोन हेरॉन मार्क-2 लाँच केले होते. ड्रोनने दहशतवाद्याला शोधून ग्रेनेड फेकून खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांनी कोकरनागमध्ये दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाणही उद्ध्वस्त केले. चकमकीदरम्यान मुसळधार पावसातही हेरॉन आपली कामगिरी चोख पार पाडली. क्वाड कॉप्टर ड्रोनने दहशतवाद्यांना पिटाळून लावण्यात मदत केली. हे ड्रोन एकाच वेळी पाच बाजूंनी गोळ्या आणि ग्रेनेड डागू शकते. हे 15 किमी अंतरावरून चालवता येते.
बारामुल्लामध्ये तीन पैकी 2 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले
पीर पंजाल ब्रिगेडचे कमांडर पीएमएस ढिल्लोन म्हणाले की, “बारामुल्लामधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) उरी, हातलंगा भागात 16 सप्टेंबर रोजी तीन दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सकाळी 6 वाजता सुरू झाले आणि 8 तासांनंतर दुपारी 2 वाजता संपले.” ते पुढे म्हणाले की, “दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले, तिसर्याचा मृतदेह सीमेजवळ पडला होता. मात्र, पाकिस्तानी चौकीतून सतत गोळीबार होत असल्याने आमच्या सुरक्षा दलांना मृतदेह सापडला नाही. पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना मदत करत होते. या दहशतवाद्यांना लष्कर संरक्षण देत होते.”
दारूगोळा आणि पाकिस्तानी चलनही जप्त
16 सप्टेंबर रोजी बारामुल्लात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफल, 7 मॅगझिन, एक चिनी पिस्तूल, सात हँडग्रेनेड, पाच किलो आयईडी आणि इतर युद्धसामुग्री जप्त करण्यात आली. त्यांच्या बॅगेतून पाकिस्तानच्या 6 हजार आणि भारताच्या 46 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]