[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
छत्रपती संभाजीनगर : राजकारणापेक्षा प्रथा आणि परंपरा कधीही सर्वश्रेष्ठ असते. विशेष म्हणजे हेच दाखवणारे चित्र आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात पाहायला मिळाले. कारण कधीही एकत्र नसलेले आणि व्यासपीठावर कधीच एकत्र न येणारे सर्वपक्षीय नेते शहरातील संस्थान गणपतीच्या पूजेसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ही सकारत्मक बाब असून, वर्षोनुवर्षे छत्रपती संभाजीनगर शहरातील राजकारण्यांनी ही प्रथा जपली आहे. त्यामुळे आजच्या गणेशोत्सवात उद्धव ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपचे नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. एवढच नाही तर रोज एकेमकांवर टीका करणारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या डोक्यात टोपी घालून त्यांचे स्वागत केले.
दानवेंनी मंत्री भुमरेंना टोपी घातली…
यंदाही छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या आरतीच्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वच महत्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, आरतीच्या वेळी भुमरे यांच्या डोक्यात टोपी नसल्याने अंबादास दानवे यांनी भुमरेंच्या डोक्यात भगवी टोपी घातली. भुमरे यांनी देखील सन्मानाने टोपी डोक्यात घालून घेतली. मात्र, दानवेंनी भुमरेंना टोपी घातली? असा प्रश्न विचारताच गणपतीच्या आरतीसाठी टोपी लागते, त्यामुळे मी टोपी घातली असल्याचे दानवे म्हणाले. तर, ही राजकीय टोपी तर नाही ना? असा प्रश्न विचारताच, दानवे मला तशी टोपी घालूच शकत नसल्याचे भुमरे म्हणाले. पण ही ही भगवी टोपी असल्याचे भुमरे म्हणाले.
राजकीय नेते एकत्र आले आणि म्हणाले…
दरम्यान यावर बोलतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ‘छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर ही आमच्या मराठवाड्याची संस्कृती आहे. अशा सणासुदीच्या वेळी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवले पाहिजे. सर्वांनी एकत्र आले पाहिजे. हा संदेश फक्त नेते एकत्र आल्याने मिळत नाही, तर जनतेमध्ये देखील हा संदेश जातो की, सर्वजनिक उत्सवात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे असे उत्सव आनंदाने साजरा करण्याचा संदेश देखील जातो, असे शिरसाट म्हणाले.
तर चंद्रकांत खैरे म्हणाले की, प्रथेप्रमाणे शहरातील राजाबाजार येथील संस्थान गणपती येथूनच गणेशोत्सवाची सुरवात होत असते. त्यामुळे आम्ही सर्व मिळून संस्थान गणपती ट्रस्टच्या माध्यमातून एकत्र येऊन कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो.
यावर बोलतांना मंत्री अतुल सावे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच उत्सव म्हणजेच गणपती असो, शिवजयंती असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो सर्वच पक्षाचे नेते एकत्र येत असतात. तसेच आम्ही सर्व मिळून हे कार्यक्रम एकत्रित साजरे करत असतो. त्यामुळे प्रथेप्रमाणे यंदाही आम्ही संस्थान गणपती येथे राजकीय जोडे बाजूला ठेवून गणेशोत्सव साजरा करत असल्याचे सावे म्हणाले.
तर, पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, आज गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व मिळून आरतीसाठी येथे आलो आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि समाजकरणाच्या वेळी समाजकारण केले पाहिजे, असे भुमरे म्हणाले.
यावेळी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, येथे गणपती बाप्पा आहे. त्यामुळे याठिकाणी टीका टिप्पणी काहीच नाही. गणेशोत्सव असून सर्वांनी एकत्र मोठ्या उत्साहात साजरा करायचा. दुष्काळ टळू दे आणि पाऊस पडू दे अशी आमच्या सर्वांची मिळून गणपतीकडे मागणी असल्याचे दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Ganesh Chaturthi Celebrations : मराठवाड्याची राजधानी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज; दोन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
[ad_2]