[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भंडारा : शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. आम्ही तुम्हाला भीक मागत नाही. शेतकऱ्यांना त्रास दिल्यास अधिकाऱ्यांना तुडवल्याशिवाय किंवा त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचे खळबळजनक वक्तव्य प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केले. बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भंडाऱ्यातील एका मोर्चात ते बोलत होते.
बच्चू कडू हे आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जातात. त्यांच्या विरोधात काही आंदोलनात गुन्हेदेखील दाखल आहेत. भंडाऱ्यातील मोर्चात बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले की, मी 350 आंदोलन केले, त्यात माझ्यावर गुन्हे दाखल आहेत. मी आमदार असलो तरी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीला घेऊन ही सभा कडूलिंबाच्या झाडाखाली होत आहे आणि मी पण कडू आहे, हे अधिकाऱ्यांनी विसरू नये असा इशारा देताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना माघारी पाठवू असे वक्तव्य केले.
शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर, आमच्यासारखे नालायक अवलाद नाही, असा धमकीवजा इशारा बच्चू कडू यांनी आंदोलनादरम्यान वनाधिकाऱ्यांनी दिला. वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली. 12 ऑक्टोंबरपर्यंत निर्णय घेण्याचं ठरलं असून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबित करण्यात येईल, असं आश्वासन बच्चू कडू यांनी मोर्चेकराना दिलं.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर यांना जीव गमावावा लागला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र, वन विभागानं नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळं बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात भंडाऱ्याच्या पवनी इथं ‘प्रहार’ पक्षाच्या वतीनं वन विभागावर गदर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेले बच्चू कडूंनी बैलगाडीवर स्वार होऊन मोर्चाचं नेतृत्व केले. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चा वन कार्यालयावर पोहचला तेव्हा तिथं वनाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दहशतवाद्याची व्याख्या नाना पटोले यांना माहीत नसेल, त्यांनी समजावून घ्यावी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुपर आतंकवादी असल्याची टीका काल भंडाऱ्यात केली होती. यावर बोलताना बच्चू कडू यांनी, इतक्या खालच्या स्तरावरची टीका करू नये असे म्हटले. दहशतवाद्याची व्याख्या नाना पटोले यांना माहीत नसेल, त्यांनी आतंकवाद्याची व्याख्या समजावून घ्यावी. एखाद्याला विरोध असणे हे ठीक आहे. कुठल्या टोकावरच्या टीका केल्या पाहिजे, याच्याही काही मर्यादा पाळल्या पाहिजेत असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
[ad_2]