झिंगाट बातमी! मेंढ्यांनी फस्त केली 272 किलो गांजाची रोपं अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Flock Of Sheep Eat 272 Kg Marijuana: ग्रीसमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथे मेंढ्यांचा एक कळप ग्रीसमधील ग्रीनहाऊसमध्ये घुसला. त्यानंतर या मेंढ्यांनी वैद्यकीय वापरासाठी लागवड करण्यात आलेला 600 पौंड (म्हणजेच जवळपास 300 किलो अगदी अचूक सांगायचं झाल्यास 272 किलोग्राम) गांजाची रोपटी खाल्ली. यासंदर्भातील वृत्त ‘न्यूजवीक’ने दिलं आहे. ग्रीसमध्ये आलेल्या डॅनियल वादळानंतर मेंढ्या पुराच्या पाण्यापासून आश्रयाच्या शोधत असताना त्या या ग्रीनहाऊसमध्ये घुसल्या आणि त्यांनी ही गांजाची झाडं खाल्ली.

नक्की घडलं काय?

ग्रीसमध्ये वैद्यकीय वापारासाठी मॅरिजुआना (गांजाची) ग्रीनहाऊसमध्ये लागवड करण्यास परवानगी आहे. ग्रीसमधील थेसाली येथील अल्मायरोस शहराजवळ अशाच एका ग्रीनहाऊसमध्ये शुक्रवारी मेंढ्यांच्या एका कळपाने घुसखोरी केली. शुक्रवारी अल्मायरॉस शहरात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे मेंढ्यांचा हा कळप पावसापासून निवारा शोधण्यासाठी सैरावैरा पळू लागला. तितक्यात या कळपाला हे ग्रीनहाऊस दिसलं आणि हा संपूर्ण कळप ग्रीनहाऊसमध्ये घुसला.

गांजा खाल्ल्यानंतर मेंढ्यांना काय झालं?

पाहता पाहता या मेंढ्यांनी या ग्रीनहाऊसमधील गांजाची 600 पौंडपेक्षा (272 किलोग्रामपेक्षा) जास्त किलो वजनाची रोपटी फस्त केली. नंतर या मेंढ्यांच्या मालकाला म्हणजेच मेंढपाळाला या मेंढ्या सापडल्या तेव्हा त्या विचित्रपणे वागत असल्याचं त्याला जाणवलं. या बातमीसंदर्भात व्हायरल होत असलेल्या काही अफवांनुसार, गांजाची रोपटी खाल्ल्यानंतर या मेंढ्यांना दगड मारल्यास त्या आनंद व्यक्त करत होत्या असंही ‘न्यूजवीक’ने नमूद केलं आहे.

या मेंढ्या शेळ्यांपेक्षाही उंच उड्या मारत आहेत

एका ग्रीक प्रसारमाध्यम कंपनीने मेंढ्यांची मालकी असलेल्या फर्मचे मालक यानिस बोरोनिस यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. यानिस बोरोनिस यांनी स्थानिक रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, “त्यांना (मेंढ्यांना) खायला हिरवे पदार्थ सापडले आणि ते त्यांनी खाल्ले” असं म्हटलं. “या मेंढ्या शेळ्यांपेक्षा उंच उडी मारत होत्या. मी यापूर्वी असं कधीही पाहिलेलं नाही,” असंही यानिस बोरोनिस म्हणाले. 

ग्रीनहाऊसच्या मालक म्हणतो…

ग्रीनहाऊसच्या मालकाने स्थानिक ‘द न्यूज पेपर डॉट जीआर’ या वेबसाइटला प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरावर हसावं की रडावं मला कळत नाही. यापूर्वी आमच्याकडे उष्णतेची लाट आल्याने आम्ही बरेच उत्पादन गमावले. आता हा पूर आला. आम्ही जवळजवळ सर्व काही गमावलं असतानाच आता हे असं घडलं. कळप ग्रीनहाऊसमध्ये शिरला आणि जे काही पिक उरलं होतं ते खाल्लं. खरं सांगायचं झालं तर नक्की काय बोलावं हे मला कळत नाही,” अशी प्रतिक्रिया मालकाने नोंदवली आहे. 

गांजा वापराला कायदेशीर मंजूरी

2017 मध्ये ग्रीक सरकारने वैद्यकीय हेतूसाठी गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली आहे. 2023 मध्ये, ग्रीसने देशात पहिल्या-वहिल्या औषधी गांजा उत्पादनाचा कारखाना सुरु केला. वैद्यकीय वापरासाठी गांजाच्या लागवडीला परवानगी दिल्याने देशासात आवश्यक त्या सर्व आर्थिक तरतुदी केल्या जात असल्याचे समजते.

Related posts