[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मुद्द्यावरून राज्यभर वातावरण पेटलं असताना, अनेक ठिकाणी जाळपोळ होत असताना या प्रश्नी सरकारकडून अपेक्षित हालचाल होत नसल्याचं चित्र आहे. मराठ्यांना आरक्षण देणारच असं सांगत शिवरायांसमोर शपथ घेणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या प्रश्नावरून एकाकी पडले का असा प्रश्न पडला आहे. कारण एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या नियोजित छत्तीसगडच्या दौऱ्याला प्राधान्य दिलं तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते या सर्वांपासून लांब आहेत.
दसरा मेळाव्यात 24 ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदेंनी छत्रपती शिवरायांची शपथ घेत, मराठा आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. आताही एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन, कुणबी दाखल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र नजरेतून चुकत नाही आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची असलेली अनुपस्थिती. त्यामुळे, मराठा आंदोलन तीव्र झालेली असताना, एकनाथ शिंदे एकाकी लढा देतायत का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थितीत
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत 24 तारखेला शपथ घेतली आणि मनोज जरांगे पाटलांनी 25 तारखेला उपोषण सुरु केलं. जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पहिल्या दिवशी गिरीश महाजनांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. त्यानंतरचे काही दिवस जरांगे पाटील आणि सरकारमध्ये थेट संवादच झाला नाही. मराठा आंदोलन तीव्र होत असतानाच सरकारनं मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेणार असल्याची घोषणा केली. 30 ऑक्टोबरला मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली.
पण ज्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली त्या दिवशी सरकारमधले दोन्हीही उपमुख्यमंत्री हजर नव्हते. अजित पवार आजारी असल्यानं कुठल्याही सरकारी कार्यक्रमात नव्हते. तर देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात होते. त्यामुळं मुख्यमंत्री शिंदेंनी एकट्यानंच पत्रकार परिषद घेतली.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरलंय. दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयातून पलायन केल्याची टीका राऊतांनी केली. संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून पलायन केलं आहे. एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पेटलेला असताना, महाराष्ट्र खदखदत असताना छत्तीसगडमध्ये प्रचार करतायत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कुठला मच्छर चावला आणि डेंग्यू झाला हा तपासाचा विषय आहे. मोक्याच्या क्षणी मच्छर चावल्यानं त्यांना डेंग्यू झाला आहे
जरांगे पाटलांनी आजपर्यंत मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलंय. फडणवीस आणि अजित पवारांवर मात्र त्यांचा रोष आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं उग्र रुप धारण केलं आणि जरांगे पाटीलही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या पुढे घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांना पूर्ण करावी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रश्नातून पळ काढत असल्याची टीका विरोधकांनी केली. त्यामुळं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन शिंदे चक्रव्यूहात सापडले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही बातमी वाचा:
[ad_2]