( प्रगत भारत । pragatbharat.com)
Woman Gives Hormone Pills To Minor: लेकीला हिरोइन बनवण्यासाठी आईनेच अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार केला आहे. मुलगी तिच्या वयापेक्षा मोठी दिसावी म्हणून तिची आई तिला हार्मोन्सच्या गोळ्या देत असे. या गोळ्यांमुळं अल्पवयीन मुलीच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. मुलीचे वय फक्त १६ वर्ष असून तिची आई गेल्या चार वर्षांपासून तिला हार्मोन्स पिल्स देत होती. अखेर रोजच्या त्रासाला वैतागून अल्पवयीन मुलीचे चाइल्डलाइनमध्ये गुरुवारी तक्रार दाखल केली आहे. (Mom forces hormone pills on minor)
पोटच्या मुलीसोबत घृणास्पद प्रकार
आंध्र प्रदेशमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. चाइल्डलाइनला तक्रार करताच बाल अधिकार संरक्षण आयोगाने पीडित मुलीला तिथून बाहेर काढले आहे. मुलीच्या तक्रारीनुसार, ती आता अकरावीत शिकते आहे. तिची आई तिला काही गोळ्यांचा ओव्हरडोस देत असते. गोळ्या खाल्ल्यानंतर ती बेशुद्ध होत असे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या संपूर्ण शरिराला सूज येत असे. सूज आल्यानंतर अंगदुखी सुरू व्हायची. यामुळं तिच्या अभ्यासावर परिमाम व्हायचा, असं पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
मुलीला शारीरिक संबंध ठेवण्याची जबाबदारी
इतकंच नव्हे तर तिला चित्रपटात काम मिळावे म्हणून एका व्यक्तीची चित्रपट निर्माता म्हणून ओळख करुन दिली. तसंच, त्याला घरी बोलवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असंही तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
नकार दिल्यास आई द्यायची धमकी
माझं बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझी आई चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्यासोबत मला तयार करत होती. जेव्हा पण मी हार्मोन्सच्या गोळ्या घेण्यास नकार द्यायची तेव्हा ती मला मारहाण करायची. मला इलेक्ट्रिक शॉक देण्याची धमकीदेखील द्यायची, असंही पीडित मुलीने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे.
बाल संरक्षण आयोगाने केली सुटका
राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष केसली अप्पा राव यांच्या नेतृत्वाखाली बाल कल्याण समितीने शुक्रवारी पोलिस अधिकाऱ्यांसोबत पीडित मुलीच्या घरी धाड टाकली व त्यानंतर मुलीला रेस्क्यू करण्यात आले. यावेळी मुलीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की तिचे वडील राजेश कुमार यांनी तिच्या आईला घटस्फोट दिला आहे. तेव्हापासून ती आणि तिची आई दोघीच राहतात. वडिलांनी घटस्फोटानंतर दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. मात्र, त्यानंतर काही वर्षांतच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून तपास सुरू
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, पीडित मुलीने ११२ क्रमांकावर फोन केला होता. मात्र तेव्हा तिला कोणती मदत मिळाली नाही. त्यानंतर तिने गुरुवारी अन्य एका व्यक्तीची मदत घेत चाइल्डलाइनच्या १०९८ क्रमांकावर फोन केला. बाल संरक्षण आयोगाने महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पीडित तरुणीची तक्रार पोलिसांकडे सोपवली आहे. तर, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.