[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लाकडी पेटीत भाऊ-बहिणीचे मृतदेह सापडले
दिल्लीतील जामिया नगरमधील बाटला हाऊस परिसरात दोन लहान मुलांचे मृतदेह सापडले आहेत. हे दोघेही भाऊ-बहीण असल्याची माहिती आहे. ८ वर्षांचा नीरज आणि ६ वर्षांची आरती अशी या दोघांची नावं आहेत. जामिया नगरच्या एफ-२ जोगाबाई एक्स्टेंशनमध्ये दोन मुलांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दुपारी आई-वडिलांसोबत जेवले अन् मग बेपत्ता झाले
हे दोन्ही चिमुकले याच घरात आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. त्यांचे वडील बलबीर हे याच इमारतीत चौकीदार म्हणून काम करतात. दोन्ही मुलं दुपारपासून बेपत्ता होते. या दोघांचे मृतदेह एका लाकडी पेटीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर, मुलांचे मृतदेह सापडल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थित साऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. या लहान मुलांशी कुणाचं काय वैर असेल असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
मुलांच्या शरीरावर जखमांच्या कुठल्याही खुणा नाही
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, दोन्ही मुलांनी त्यांच्या पालकांसोबत दुपारी ३ वाजता जेवण केले होते. यानंतर दोघेही दुपारी ३.३० वाजल्यापासून बेपत्ता होते. बराच वेळ मुले बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. नंतर दोघेही लाकडी पेटीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मुलांच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. या घटनेने संपूर्ण बाटला हाऊस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
[ad_2]