( प्रगत भारत । pragatbharat.com)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवच्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद अशी या मंत्र्यांची नावं आहेत. अनेक सेलिब्रिटी, उद्योगपतींनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे. तसंच भारतीयांनी #BoycottMaldives ट्रेंड सुरु केला आहे. यामुळे मालदीवमधील काही नेते घाबरले असून, आपली चिंता व्यक्त करत आहेत. माजी मंत्री अहमद महलूफ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडल असून अर्थव्यवस्था ढासळेल असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्यानंतर अनेक भारतीयांनी आपला मालदीव दौरा रद्द केला आहे. अहमद महलूफ यांनी काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या कथित वर्णद्वेषी टिप्पण्यांमुळे बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अहमद महलूफ यांनी भारत नेहमीच मालदीवचा निकटचा शेजारी देश असेल आणि तिथे भारतीयांचं नेहमी स्वागत केलं जाईल असं म्हटलं आहे. एक्सवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, “आमच्या जवळच्या शेजाऱ्यांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे बिडडलेल्या परिस्थितीवर मी फार चिंतीत आहे”.
नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद यांनी सोशल मीडियारुन अतिशय आक्षेपार्ह विधानं केली होती. त्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आणि भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मालदीव सरकारने यावर स्पष्टीकरण देताना ही विधान मालदीव सरकारच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत नाहीत असं सांगितलं होतं.
I’m deeply worried about the escalating situation regarding the sensitive comments about our closest neighbor.
Indians boycotting the Maldives would have a huge impact on our economy. It would be hard for us to recover from such a campaign.
I call on the government to swiftly…
— Ahmed Mahloof (@AhmedMahloof) January 7, 2024
अहमद महलूफ यांनी पुढे लिहिलं आहे की, “भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. अशा मोहिमेतून सावरणे आम्हाला कठीण जाईल. मी सरकारला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलण्याचं आवाहन करतो”.
“भारत नेहमीच आपला जवळचा शेजारी राहील. ती वस्तुस्थिती आहे. आमचे भारत आणि भारतीयांवर प्रेम आहे, मालदीवमध्ये त्यांचे नेहमीच स्वागत आहे. मालदीवचा एक सामान्य नागरिक म्हणून, काही मालदीवच्या लोकांनी भारतीय आणि पंतप्रधानांबद्दल केलेल्या वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल मी माफी मागतो,” असंही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जानेवारीला लक्षद्वीप बेटाजवळ अरबी समुद्रात स्नॉर्कलिंग केल्याची आणि किनाऱ्यावर फेरफटका मारत असल्याचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर मालदीवमधील नेत्यांनी आक्षेपार्ह शब्दात टिप्पण्या केल्या होत्या. भारत सरकारनेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त मुन्नू महेश्वर यांनी मंत्र्यांच्या विधानाबाबत तेथील परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे.