19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं…; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Layoffs: 2023 मध्ये अनेक मोठ्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. 2024मध्येही काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने अलीकडेच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीचा फटका एका व्यक्तीला बसला आहे. या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे दुखः मांडले आहे. कर्माचारीने म्हटलं आहे की, 19 वर्ष एकाच कंपनीत काम करुन प्रामाणिक राहूनही त्याच्यावर ही वेळ आले. 

केविन बौरिलियन असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गेली 19 वर्षे तो गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होता. एक दिवस अचानक सकाळी त्याला मेल आला की त्याला कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. केविनला आलेला अनुभव त्याने ट्विटरवरुन शेअर केला आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करताना त्यांने म्हटलं आहे की, एका युगाचा अंत झाला आहे. गुगलमध्ये 19 वर्ष काम केल्यानंतरही मी ज्या टीमची स्थापना केली होती.  त्यातील 16 लोकांना एका रात्रीत कंपनीने अचानक नोकरीवरुन काढून टाकले आहे. 

केव्हिनने पुढे म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांची कपात ही खूप वेदनादायक गोष्ट आहे. पण माझ्याबाबतीत बोलायचे झाल्यास मी हे सहन करु शकतो. मी इतक्यात कोणती नोकरी करु शकत नाही. मी माझा पूर्ण वेळ सायकलिंग, पुस्तक वाचणे, ड्रम  वाजवायला शिकणे आणि कुटुंबासोबत पूर्ण वेळ व्यतित करणार आहे. 

केव्हिन बॉरिलियनच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, 19 वर्ष 4 महिने तो गुगलमध्ये कार्यरत होता. त्याने आपल्या पोस्टमध्ये गुगलच्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत म्हटलं आहे की, मला जे काही मिळालंय ते मी आशीर्वाद मिळाल्याचे मानतो. मला या कर्मचारी कपातीबाबत कोणत्याही प्रकारची सहानुभूतीची गरज नाहीये. पुढचं आयुष्य कसं जगायचं, याची प्लानिंग मी करत आहे, असंही त्याने पुढे म्हटलं आहे. 

गुगलने 2024मध्ये केली कर्मचारी कपातीची घोषणा

2024 च्या सुरुवातीला जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा प्लान केला आहे. कंपनीने ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये हार्डवेअर, कोर इंजिनीयरिंग आणि गुगल असिस्टेंटच्या टीम आहेत. त्याचबरोबर व्हॉइस अॅक्टिव्हेटेड गुगल असिस्टेंट सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या लोकांवर या कर्मचारी कपातीचा थेट परिणाम होणार आहे.  

Related posts