बर्थडे पार्टीआधी तुफान राडा! स्थानिकांच्या मारहाणीत फार्म हाऊस मालक, विद्यार्थ्याचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Farmhouse Owner Delhi Student Killed In Fight: हरियाणामधील गुरुग्राम येथे झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये एका फार्म हाऊसचा मालक आणि दुसऱ्या वर्षातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी कार पार्किंगच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादानंतर या दोघांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या या दोघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

6 जण गंभीर जखमी

गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोघांना अटक केली आहे. मरण पावलेल्या 2 व्यक्तींबरोबरच्या काही व्यक्ती आणि स्थानिक असे एकूण 6 जण या हाणामारीमध्ये जखमी झाले आहेत. बालिवास गावातील फार्म हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बर्थ डे पार्टीसाठी हे तरुण आले असता पार्किंगवरुन वाद झाला. 

एकाचा सोमवारी तर दुसऱ्याचा मंगळवारी झाला मृत्यू

ओएसीस गार्डन फार्महाऊसचा मालक असलेला प्रवीण आणि दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या गजेंद्र यांना हणामारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांनाही गंभीर इजा झाली होती. यापैकी प्रवीणचा मृत्यू सोमवारी झाला. तर गजेंद्रचा मृत्यू ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्समध्ये मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणासाठी आलेल्या तरुणांनी या फार्म हाऊससमोरच्या चिंचोळ्या रस्त्यावर कार पार्क केल्या होत्या. यावरुनच दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. गाडी पार्क करणाऱ्या स्थानिक व्यक्तीने फोन करुन इतर व्यक्तींना घटनास्थळी गोळा केलं आणि फार्म हाऊसवर हल्ला चढवला. प्रवीणने या हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. 

हत्येचा गुन्हा दाखल

या प्रकरणामध्ये याच फार्महाऊसमधील अन्य एक मालक नरेश कुमारने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हत्या, हत्येचा प्रयत्न यासारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश, नरवीर आणि प्रवीण हे तिघे एकत्रीतपणे हे फार्म हाऊस चालवतात. हे तिघेही हरयाणामधील रामराई गावातील रहिवाशी आहेत. 

पोलिसांनी दोघांना केलं अटक

या प्रकरणात पोलिसांनी सचिन आणि आशिष नावाच्या स्थानिक व्यक्तींना अटक केली आहे. “तपासादरम्यान पार्किंगवरुन वाद झाल्याचं समोर आलं असून त्यामधूनच हाणामारी झाली. इतर आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही छापेमारी करत आहोत,” अशी माहिती सिकंदरापूरच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सतेंदर रावत यांनी सांगितलं.

Related posts