[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुतखड्याचा त्रास अतिशय वेदनादायी असतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास किडनीला आणि पर्यायाने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे जाणवताच वेळेत उपचार घेणे आवश्यक असते. शरीरातील क्षाराचे प्रमाण वाढले, की ते क्षार किडनीत साठून राहतात. मग त्याचे थर साचून मुतखडा तयार होतो. हा खडा लहान असेल, तर औषधे व भरपूर पाणी प्यायल्याने शरीराबाहेर जातो. मात्र, मोठा खडा असेल, तर शस्त्रक्रिया करून बाहेर काढावा लागतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मणिपाल हॉस्पिटलचे मूत्रपिंडविकार तज्ज्ञ (नेफ्रोलॉजिस्ट) तरुण जेलोका म्हणाले, ‘मुतखड्याचा त्रास सर्वच वयोगटांतील व्यक्तींना होऊ शकते. मात्र, गेल्या काही वर्षांत २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येत आहे. मुतखड्याचे लवकर निदान झाल्यास या आजारातून बरे होता येते. या आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत; परंतु सरासरी ९० टक्के रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. खडा सहा ते नऊ मिलिमीटर असेल, तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. स्टोन नऊ मिलिमीटरपेक्षा वर असेल, तरच शस्त्रक्रिया करावी लागते.
किडनी स्टोनचे प्रमाण वाढण्याची कारणे
– पाणी कमी पिणे
– व्याय़ामाचा अभाव
– जास्त वेळ ‘एसी’मध्ये राहिल्याने घाम येत नाही.
– दूषित पाणी.
– अतिप्रमाणात मीठाचे सेवन करणे
– बैठी जीवनशैली
– अतिप्रमाणात कॉफीचे सेवन
– आनुवंशिकता
किडनी स्टोनची लक्षणे?
– पाठ किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना होणे
– मळमळणे आणि उलट्या होणे
– लघवीमधून रक्त जाणे
– वारंवार लघवी येणे
– लघवी करताना दुखणे
पाणी कमी प्यायल्याने मुतखड्याचा त्रास होतो. त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. मुतखड्याचा त्रास असलेल्या रुग्णांनी शहाळ्याचे पाणी प्यावे. कारले, गाजर, बदाम, अननसाचा रस, फळांचा रस, केळी यांचा आहारात समावेश करावा. टोमॅटो, पालक, चवळी, वांगी, मशरूम, चिकू, द्राक्षे, मटण, काजू, चॉकलेट यांचा आहारात समावेश करू नये.- डॉ. आदित्य देशपांडे, मूत्ररोगविकार तज्ज्ञ (यूरोलॉजिस्ट)
बदलत्या जीवनशैलीमुळे बैठ्या कामांचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या वेळांमध्ये बदल होत असल्याने झोपेचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम शरीरावर होत आहे. सतत वातानुकूलित वातावरणात राहिल्याने तहान लागत नाही. त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मुतखड्याच्या समस्या वाढल्याचे दिसून येते. खड्यामुळे किडनीला अडथळा निर्माण झाला, तर किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.- डॉ. श्रेयस भद्रनवार, मूत्ररोगविकार तज्ज्ञ (यूरोलॉजिस्ट), युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूट
[ad_2]