[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
वातानुकूलित (एसी) लोकलचे बनावट तिकीट बनवणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडलेला विद्यार्थी आहे. महिला टीसीच्या सतर्कतेमुळे सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी करत असताना दक्षता पथकासह महिला तिकीट परीक्षकांनी २१ वर्षीय तरुणाकडील मोबाइल तिकीट तपासले. या तिकिटामध्ये गडबड असल्याचे आढळले. फेरतपासणी करण्यासाठी महिला तिकीट निरीक्षक जिल सेंटो आणि स्नेहल यांनी तरुणाला अॅपमधील तिकीट दाखवण्यास सांगितले. तेव्हा तिकिटाचा फक्त स्क्रीनशॉट दाखवत काम करत नसलेल्या दुसऱ्या फोनद्वारे तिकीट काढले आणि स्क्रीनशॉट वैध तिकीट आहे, असे त्या तरुणाने सांगितले.
तिकिटावरील यूटीएस क्रमांक आरोपीच्या नावाशी जुळत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांचा संशय बळावला. दरम्यान, तरुणाने टीसीशी मोठ्या आवाजात वाद घालण्यास सुरुवात केली. टीसींनी दक्षता पथकाला पाचारण केले आणि त्याला बोरिवली स्थानकात नेऊन चौकशी सुरू केली.
तपासणीत तिकीट बनावट असल्याचे उघड झाले. तिकीट तयार करण्यासाठी यूट्यूब आणि आयफोनच्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक बाब चौकशीअंती उघडकीस आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता, तरुणाने ४८ हजार रुपये किंमतीची ११ तिकीटे बनवली होती. यापैकी सात तिकिटे प्रवासी वापरत आहेत, अशी माहिती उघड झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीवर अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात खोटारडेपणा आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
‘मेट्रो ७ आणि २अ’ने पार केला ३ कोटी प्रवाशांचा टप्पा
माथेरानची टॉय ट्रेन बनली मुंबईकरांची पहिली पसंती
[ad_2]