[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
काल दिवसभर अवघड दिवेघाट चालून आल्यावर आज वारकऱ्यांच्या दिंड्यांनी सासवडमध्येच तळ ठोकला. पुण्यात 2 दिवस राहिल्यानंतर अवघड घाट चढणं वारकऱ्यांना मनाने उत्साह देणारं असलं तरी शरीर थकल्यामुळे त्यांना घाट चढून आल्यावर पुढे जाणं नाही झेपत म्हणून दोन दिवस या माऊलींची पालखी सासवडमध्ये विसावा घेते. याचमुळे आज काही पायी चालणं झालं नाही. किंवा दिंड्यांचा आनंद घेता आला नाही. कारण सासवडच्या आजूबाजूला आपापल्या राहुट्या ठोकत वारकऱ्यांनी छान विसावा घेतला. विसाव्यामुळे सासवडला यात्रेचे स्वरूप आले होते.
माऊली जरी सासवड मुक्कामी असल्या तरी आज मात्र, माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव ऊर्फ सोपानकाका पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार होते. पहाटे लवकर उठत संस्थानाच्या प्रमुखांनी सोपानदेवांच्या पादुकांचे पूजन करत प्रस्थानाची तयारी सुरू केली. धाकट्या सोपानकाकांचा हा पालखी सोहळा तसा फारसा जुना नाही. त्यामुळे साहजिकच सोपानकाकांच्या पालखी प्रस्थानाला लाखोंचा संप्रदाय एकत्र आला नव्हता. मात्र, आजची गर्दीही काही कमी नव्हती. साधारण 1904 साली अधिकृतपणे सुरू झालेला सोपानदेवांचा पालखी सोहळा हा बघता बघता थोड्याच काळात मोठा होत गेला आहे आणि त्याचा प्रत्यय आज आला. समाधी मंदिराबाहेर कित्येक वारकऱ्यांनी अक्षरशः सकाळपासून फुगड्या खेळत, भजनं गात परिसर दणाणून सोडला. खूप अफाट गर्दी नसली तरी जो वारकरी होता, तो प्रत्येक संताला आपलं मानणारा होता. त्यात हे तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपनकाका आणि आदिशक्ती मुक्ताई या चारही भावंडांवर अखंड वारकरी संप्रदायाचं विशेष प्रेम असल्याने आज मोठमोठ्या सांप्रदायिक लोकांनी या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली. खुद्द या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली. नुसती हजेरीच नाही लावली तर त्यांनी प्रत्यक्षात टाळही हाती घेतला. कालपासून विसाव्याला असलेल्या अनेक वारकऱ्यांनी संत सोपानदेवांचे दर्शन घेतले. यादरम्यान संत सोपानदेव पालखी संस्थानतर्फे कालपासून सासवड येथील पालखी तळावर मुक्कामी असलेल्या माउलींना नैवेद्य पाठवण्यात आला. त्यानंतर माउलींकडूनही सोपानकाकांसाठी नैवेद्य पाठवण्यात आला. दोन्ही संतांना नैवेद्य दाखवल्यावर दिंड्यांचा भजनाला सुरुवात झाली. संत सोपानदेव समाधी मंदिराच्या प्रांगणात शेकडो टाळकऱ्यांनी एक ठेका धरत टाळावर आघात करत एक सामूहिक नाद उत्पन्न करायला सुरुवात केली. त्या टाळकऱ्यांच्या मधोमध काही पखवाजवादक पखवाजावर जशी जशी थाप देत होते तसा नाचायचा मोह होत होता. महाराज, त्या नादाने वातावरण असं झालं होतं की काही क्षण संत सोपानदेव खरंच पंढरीला निघत आहेत हा भास होऊन गेला. एवढा दिमाखदार सोहळा होता तो. पुढे नगारा, त्यानंतर मागे स्वाराचा अश्व मग सोपानदेवांचा अश्व आणि त्यांनतर पालखीच रथ असं स्वरूप एकंदरीत या पालखी सोहळ्याचं होतं. जीवित असताना जगाची बोलणी खाणाऱ्या आणि तरीही जगाला वाट दाखवणाऱ्या या भावंडांचं मला अप्रूपच वाटतं. ते जाऊन आज केवढा मोठा काळ लोटला आहे. तरीही त्यांची कीर्ती ही कमीच होत नाही किंबहुना आणखीन कित्येक पटीने वाढलीच आहे. पालखी बघायला दुरवरून येणाऱ्या लोकांकडे बघून आज हे प्रकर्षानं जाणवलं. झालं… दुपारी 1 वाजता पालखी पांघारी मार्गे पंढरपूरला निघाली आणि माऊलींसोबतचे वारकरी पुन्हा विसाव्याला येऊन बसले.
आज द्वादशी असल्याने कित्येक वारकऱ्यांनी आज उपवास सोडत दुपारून मस्त ठिकठिकाणी ताणून झोप घेतली. झोपा काढून किंवा विसाव्याला बसून वारकरी कंटाळल्यावर थोडे सासवड फिरूनही आले. काहींनी पुण्यात उरलेला बाजार, नातवांसाठी खेळणी सासवडमधून घेतली. पाऊस पडला नसल्याने दुपारी ऊन थोडं चटके मारत होतं. वारकऱ्यांनी आपापल्या राहुट्यांमध्ये आराम करत ऊन उतरल्यावर हरिपाठासाठी लगबग सूरू केली. सर्व राहुट्यांमध्ये हरिपाठ संपन्न झाल्यावर एकत्र बनवलेलं जेवण घेत वारकरी कीर्तनाला जमले. रात्री मस्त कीर्तन पार पडले. आणि आजच्या दिवसाचा शेवट झाला. उद्या सायंकाळी जेजुरीत पोहोचल्यावर माऊलींच्या पालखीवर भंडारा उधळला जाऊन त्यांचे जेजुरीत स्वागत केले जाईल. शैव (शिवाला मानणारे) आणि वैष्णव (विष्णूला मानणारे) उद्या एकत्र येतील. तेव्हा उद्या जेजुरीच्या गडावरून भेटूच. तूर्तास राम कृष्ण हरि…
वाचा मयूर बोरसे यांचे इतरही ब्लॉग :
[ad_2]