( प्रगत भारत । pragatbharat.com)
Deal Between Vladimir Putin And Yevgeny Prigozhin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या 2 दशकांहून अधिक काळाच्या सत्तेमधील सर्वात मोठं राजकीय बंड म्हणून मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेलं आणि शनिवारी उफाळून आलेलं ‘वॅगनर ग्रुप’चं (Wagner Group) बंड मोडून काढण्यात रशियन सकारला यश आलं आहे. रशियाला लवकरच नवीन राष्ट्राध्यक्ष मिळतील असा दावा करणारे ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांनी अवघ्या 24 तासांमध्ये माघार घेत बेलारुसला पळ काढला आहे. मात्र हे शसस्त्र बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला यश कसं आलं? रशियन सरकार आणि ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन यांच्यात नेमका काय सामंजस्य करार झाला? मॉस्को ताब्यात घेण्यासाठी निघालेल्या ‘वॅगनर ग्रुप’ पुतिन सरकारने असं काय आमिष दाखवलं की त्यांनी आहे तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला? यासंदर्भात जाणून घेऊयात…
> ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन यांनी त्यांच्या खासगी लष्करामधील तुकड्यांना शनिवारी दुपारी मॉस्कोवर चाल करुन जाण्याचे आदेश दिली.
> मात्र रविवारी अचानक प्रोगोझिन यांनी आपल्या लष्कराला थांबण्याचे आदेश दिले. ‘वॅगनर ग्रुप’चं लष्कर थांबलं तेव्हा ते मॉस्कोपासून अवघ्या 200 किलोमीटरवर होते.
> येवगेनी प्रोगोझिन हे स्वत: रशियाचा मित्र देश असलेल्या बेलारुसमध्ये निघून गेले आहेत. प्रोगोझिन यांच्याविरोधात बंडखोरी, दहशतवाद किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खटला चालवला जाणार नाही असं आश्वासन क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारकडून देण्यात आलं आहे.
> मागील 2 दशकांहून अधिक काळापासून रशियावर निर्वचस्वपणे सत्ता गाजवणाऱ्या पुतिन यांच्याविरोधातील हे सर्वात मोठं आणि गंभीर स्वरुपाचं बंड मानलं जात होतं. मात्र हे बंड मोडून काढण्यात पुतिन सरकारला अवघ्या 24 तासांमध्ये यश आलं आहे.
> शसस्त्र बंडखोरी केल्याप्रकरणी प्रोगोझिन यांच्याविरोधात कोणताही खटला चालवला जाणार नाही यासाठी रशियन सरकारने ‘वॅगनर ग्रुप’ला होकार दिला.
> तसेच प्रोगोझिन हे बेलारुसला रवाना झाले असले तरी त्यांच्याबरोबर या बंडखोरीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या लष्करी सैनिकांनाही माफी दिली जाईल असं रशियन सरकारने म्हटलं आहे. या सैनिकांविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन सरकारने प्रोगोझिन यांना दिलं असल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमेत्री पेस्कोव्ह यांनी सांगितलं आहे.
> तसेच ‘वॅगनर ग्रुप’चे जे सैनिक प्रत्यक्ष या बंडखोरीमध्ये नव्हते पण ग्रुपचे सदस्य आहेत त्यांना रशियन लष्करामध्ये सामावून घेण्यास होकार दिला आहे. या सैनिकांबरोबर रशिया सरकार विशेष करार करणार आहे.
> प्रोगोझिन यांनी केलेलं बंड हे पाठीत खंजीर खुपसल्यासारखं असून या शसस्त्र बंडखोरीमागे असलेल्या लोकांना कठोर शासन केलं जाईल असं पुतिन यांनी म्हटलं होतं. पुतिन यांनी टीव्हीवरुन देशाला उद्देशून भाषण केलं होतं.
> प्रोगोझिन आणि रशियन सरकारमधील चर्चेतून सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतर ‘वॅगनर ग्रुप’ने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. जेव्हा हे सैन्य माघारी फिरलं तेव्हा ते मॉस्कोपासून केवळ 200 किलोमीटरवर होते.
> रशियामध्ये रक्तरंजीत संघर्ष टाळण्यासाठी आम्ही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे असं प्रोगोझिन यांनी म्हटलं आहे. रशियाने 2022 मध्ये युक्रेनवर लादलेल्या युद्धाच्या दीड वर्षांनंतर या घडामोडी घडल्या आहेत.
> रशियाच्या बाजूने युक्रेनमध्ये लढणाऱ्या प्रोगोझिन यांच्या मालकीच्या ‘वॅगनर ग्रुप’ला रशियन लष्कर आणि रशियन सरकार दारुगोळा तसेच रसद पुरवठा करत नव्हते असा या गटाचा आरोप होता. अनेकदा मागणी करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने संतापून या गटाने बंड पुकरालं.
> लवकरच रशियाला नवे राष्ट्राध्यक्ष मिळतील असंही प्रोगोझिन यांनी बंड पुकारल्यानंतर सैन्य मॉस्कोकडे वाटचाल करत असताना म्हटलं होतं. मॉस्कोने या बंडखोरीचा धसका घेतल्याचं त्यांनी केलेल्या तयारीवरुन दिसून आलं. मॉस्कोला रशियन लष्कराने चारही बाजूंनी वेढा घातला होता. लोकांना घराबाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले होते.