[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
केंद्रीय मंत्रिमंडळातील काही विद्यमान मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. भाजपच्या मित्रपक्षांना या विस्तारात स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत गेलेल्या आणि मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दोघांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देऊन शिंदेंची ताकद वाढवली जाऊ शकते. मात्र शिंदेंनी केंद्राकडे ३ मंत्रिपदं मागितली आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह मंत्री अमित शहांसोबत दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झाली. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दोन्ही नेत्यांनी शहांना दिली. भाजपनं शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं देऊ केली आहेत. पण सेनेनं तीन मंत्रिपदांची मागणी केल्याचं समजतं. प्रतापराव जाधव, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे आणि गजानन किर्तीकर यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण झालं आहे. आतापर्यंत आलेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये उद्धव ठाकरे गट शिंदेंच्या शिवसेनेपुढे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून शिवसेनेला ताकद देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंना केंद्रातील सत्तेत वाटा मिळाल्यास त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसू शकतो.
मोदींचा हनुमानदेखील मंत्री होणार?
स्वत:ची ओळख मोदींचा हनुमान अशी सांगणारे चिराग पासवान यांनाही मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. चिराग यांना काही दिवसांपूर्वीच केंद्रानं झेड प्लस सुरक्षा दिली. चिराग पासवान यांनी नेहमीच मोदींचं कौतुक केलं आहे. ते जमुई मतदारसंघाचे खासदार आहेत. बिहारच्या राजकारणात ते सक्रिय असतात. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी अनेक मतदारसंघात भाजपचा तेव्हाचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड विरोधात उमेदवार दिले. त्यामुळे जेडीयूचं मोठं नुकसान झालं. तर भाजपचा फायदा झाला. पासवान यांच्या खेळीमुळे बिहारच्या राजकारणात भाजप मोठा भाऊ झाला. मात्र जेडीयूनं भाजपची साथ सोडल्यानं सरकार पडलं.
[ad_2]