[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेशकुमार म्हणाले, ‘सध्या मान्सून देशभरात सक्रिय असून, त्याची आगेकूच सुरूच आहे. कोकण, गोवा, मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यांवर दाट ढग आहेत. मध्य प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या मध्य भागाकडून उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेशात १२० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडणे अपेक्षित आहे. बंगालच्या उपसागरावरूनही आर्द्रतायुक्त वारे वाहत असल्यामुळे पूर्व आणि ईशान्य भारतातही पाच दिवसांत पाऊस अपेक्षित आहे.’
येत्या दोन दिवसांत दक्षिण गुजरात, कोकण आणि गोव्यात २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातही १२० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे – नरेशकुमार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामानशास्त्र विभाग
महाराष्ट्रात काय परिस्थिती?
हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासह आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस हजेरी लावणार आहे. यासोबतच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
भिंत कोसळून चार मुले दगावली
हलोल : गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचमहाल जिल्ह्यातील हलोल येथे औद्योगिक वसाहतीत बांधकाम कामगारांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवाऱ्याची भिंत कोसळून चार मुलांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. सर्व पीडित मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या ३६ तासांत वलसाड जिल्ह्यात १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राजस्थानातही मुसळधारेचा अंदाज
जयपूर : राजस्थानात मध्यम पाऊस सुरू असून, टोंक जिल्ह्यात चोवीस तासांत ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या चोवीस तासांत बांसवाडा, उदयपूर, बारन, चित्तोडगड, टोंक, डुंगरपूर, छोटा उदेपूर आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हिमाचलात संततधार
शिमला : राज्यातील संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिमल्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी
नवी दिल्ली : दिल्लीसह गुरुग्राममध्ये जोरदार पावसामुळे पाणी तुंबणे, वाहतूक कोंडी असे प्रकार घडले. काही ठिकाणी झाड पडण्याच्याही घटना घडल्या. दिल्ली परिसरात ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
बद्रीनाथ महामार्ग ठप्प
गोपेश्वर : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील छिनका येथे मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते.
[ad_2]