दिल्लीच्या पुरामागे मोठे षडयंत्र; ‘आप’चा भाजपवर गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Flood : यमुना नदीची (yamuna river) पाणी पातळी वाढल्याने संपूर्ण दिल्ली पाण्याखाली गेली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राजधानी दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पुराचे पाणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत (supreme court) पोहोचले. वर्दळीचा आयटीओ परिसर तसेच राजघाटही जलमय झाला आहे. अशातच दिल्लीत राजकारण सुरु झालं आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज यांनी गंभीर आरोप केला आहे. दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजप (BJP) जबाबदार आहे, असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

हरियाणातील भाजप सरकार पूरग्रस्त दिल्ली आणखी बुडविण्यासाठी हथिनीकुंड धरणाचा (hathnikund barrage) वापर करत आहे, असा आरोप मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. शनिवारी भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. “1978 मध्ये यापेक्षाही भीषण पूर आला होता. पण आता दिल्लीत पाऊसच पडत नाही. मग आता दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळी 1978 साला पेक्षाही वर कशी गेली, असा प्रश्न पडतो. दिल्लीत सहा दिवसांपासून पाऊस पडत नसताना पूर कसा आला याचा विचार करण्याची गरज आहे. हातिनीकुंड धरणामधून तीन बाजूंनी पाणी येते. मुख्य यमुना नदीबरोबरच हथिनीकुंडचे पाणीही पश्चिम आणि पूर्व कालव्यातून बाहेर येते. यमुनेचे पाणी थेट दिल्लीच्या आतून वाहते. यावेळी सर्व पाणी एका षड्यंत्राखाली दिल्लीच्या दिशेने सोडण्यात आले. 12 आणि 13 जुलै रोजी उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या ईस्टर्न कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आले नाही, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले.

नायब राज्यपालांचे आवडते अधिकारी जसे आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी आमच्या मंत्र्यांचे फोन उचलत नव्हते. रेग्युलेटरचे काम फक्त पाणी वाटपाचे आहे, असे भाजपचे काही अशिक्षित लोक सांगत आहेत. अरे, मग रेग्युलेटर का आहे? हे त्याचे काम आहे. पाण्याचे नियमन करा. हथिनीकुंडच्या लॉग बुकमध्ये हे स्पष्ट आहे की जेव्हा दिल्लीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले तेव्हा पूर्व पश्चिम कालवा रिकामा ठेवण्यात आला होता, असेही सौरभ भारद्वाज म्हणाले.

हा ठरवून आणलेला पूर – खासदार संजय सिंह

“हिमाचल, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांना पुराचा फटका बसला आहे. दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नाही, मग पुराचं कारण काय. याचे कारण भाजप आणि केंद्राचा दिल्लीप्रती असलेला द्वेष, दिल्ली नष्ट करण्याचे षडयंत्र, पंतप्रधान मोदी यांचा दिल्लीबद्दलचा द्वेष. ही आपत्तीची स्थिती आहे, ती देशाच्या कोणत्याही भागात येऊ शकते. पण हा एक ठरवून आणलेला पूर आहे. पाच राज्ये पुराच्या तडाख्याला तोंड देत असताना देशाला सोडून पंतप्रधान फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत,” असा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी शुक्रवारी आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनीही असाच आरोप केला होता. “हरियाणातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पूरग्रस्त दिल्लीला आणखी बुडविण्यासाठी हथनीकुंड धरणाचा वापर करत आहे,” असे चढ्ढा यांनी म्हटलं होतं.

Related posts