मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Brain Eating Amoeba: अमेरिकेतील नेवाडा (US Nevada) येथे एका दोन वर्षाच्या चिमुरड्याचा Naegleria fowleri संसर्ग म्हणजेच प्राणघातक मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे (Brain Eating Amoeba) मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वुड्रो बंडीच्या कुटुंबीयांना अॅश स्प्रिंग्समध्ये पाण्यात खेळत असताना त्याच्या शरीरात संसर्ग झाला असावा अशी शक्यता त्यांच्या कुटुंबाने वर्तवली आहे.

मुलाच्या आईने फेसबुकवर पोस्ट शेअर करत या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे. “वुड्रो टर्नर बंडी मध्यरात्री 2:56 वाजता स्वर्गात गेला. त्याने 7 दिवस लढा दिला. एखाद्याने केलेला हा सर्वाधिक संघर्ष आहे. याआधी तीन दिवसांचा रेकॉर्ड आहे. मला माहिती आहे की, माझ्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली मुलगा होता,” असं ब्रियाना यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “तो माझा हिरो असून, पृथ्वीवरील सर्वात चांगला मुलगा मला दिल्याबद्दल मी देवाची ऋणी आहे. माझा मुलगा आता स्वर्गात असेल ही जाणीव मला सुखावणारी आहे”.

बंडी कुटुंबाच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेव्हा मुलामध्ये गेल्या आठवड्यात संसर्गाची लागण झाल्याची लक्षणं दिसू लागली तेव्हाच त्याच्या पालकांनी काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं होतं. यानंतर ब्रियाना यांनी तात्काळ मुलाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली होती. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना हा मेंदूज्वर असल्याचं वाटलं होतं. पण नंतर मुलामध्ये प्राणघातक मेंदू खाणारा अमिबा (Brain Eating Amoeba) असल्याचं निदान झालं. यानंतर मात्र सगळीकडे चिंता व्यक्त होऊ लागली होती. याआधी 2023 मध्ये अमेरिकेतील एका 50 वर्षीय व्यक्तीचा याच आजारामुळे मृत्यू झाला आहे. 

मुलाच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी ब्रियाना यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) दोन वर्षांच्या मुलाला कोणतेही उपचार देण्यास नकार देत आहे, कारण याआधी कोणीही यातून वाचू शकलेलं नाही असा आरोप केला होता. आरोग्य संस्थेने मात्र या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

CDC नुसार, Naegleria fowleri हा एक प्रकारचा अमिबा (एकल-पेशी असलेला सजीव) आहे, जो तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या उबदार गोड्या पाण्याच्या वातावरणात आढळतो. जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकातून जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करू शकते आणि म्हणूनच त्याला मेंदू खाणारा अमिबा असेही म्हणतात. हा एक दुर्मिळ आजार असून जवळपास प्राणघातक असतो. हा आजार झाल्यास मृत्यू टाळणं अशक्य आहे. 

जेव्हा Naegleria fowleri असलेले पाणी नाकात जाते आणि अमिबा घाणेंद्रियाद्वारे मेंदूमध्ये स्थलांतरित होतो तेव्हा संसर्ग होतो. दूषित पाणी प्यायल्याने ते नाकापर्यंत जात नाही, त्यामुळे त्याच्याने संसर्ग होत नाही हे समजून घ्या. 

Naegleria युक्त पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर 1 ते 12 दिवसांनी लक्षणं दिसू लागतात. CDC च्या माहितीनुसार, लक्षणं दिसू लागल्यानंतर 1 ते 18 दिवसांत त्या रुग्णाचा मृत्यू होतो. 

लक्षणं काय?

प्रचंड डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या, चक्कर येणे, भ्रम होणे आणि कोमा ही अमिबाची लक्षणं आहेत. 

Related posts