VIDEO: सोसायटीत तुफान राडा, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; खुर्च्या एकमेकांवर फेकल्या, पोलिसांनाही सोडलं नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) एका सोसायटीत तुफान राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ ट्विटरला (Twitter) व्हायरल झाला आहे. दरम्यान, राडा सुरु असताना घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या महिलेचा फोन खेचून घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली असून, दोघांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

रविवारी ग्रेटर नोएडाच्या फ्लोरा हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत ही घटना घडली आहे. बहुमजतील इमारतीतल पार्किंगच्या मुद्द्यावरुन भांडण सुरु झालं होतं. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता नागरिकांनी त्यांच्यावरही हल्ला केला. यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. घटनास्थळाचा व्हिडीओ अनेकांनी ट्विटरला शेअर केला आहे. 

हा व्हायरल व्हिडीओत पोलीस पकडून नेत असताना स्थानिक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पोलीस त्यांना पीसीआर व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे इतर पोलीस कर्मचारी राडा घालणाऱ्या बाकीच्या नागरिकांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत दिसत आहेत. व्हिडीओत काही महिलाही पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. 

दरम्यान, ट्विटरला व्हिडीओ शेअर केलेल्यांमधील काहींनी पोलिसांवरही आरोप केले आहेत. घटनास्थळी एक महिला संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड करत असताना पोलिसांनी मोबाईल खेचून घेतला असा आरोप आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पोलीस इतरांचाही शोध घेत असून त्यांची ओळख पटवत आहेत. 

पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्वीट करत सांगितलं आहे की, “त्या व्हिडीओबद्दल आम्हाला सांगायचं आहे की, बिसरख क्षेत्रातील फ्लोरा हेरिटेज सोसायटीत 13 ऑगस्ट रोजी सोसायटीमधील पार्किंगवरुन काही लोकांमध्ये भांडण सुरु होतं. बिसरख पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने पोलिसांच्या कार्यात अडथळा आणला. यासंबंधी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतलं आहे. इतर अज्ञातांवरही कारवाई केली जाईल”.  

सीसीटीव्ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, काही लोक एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. दुकानदार आणि कार चालकांमधील या भाडणादरम्यान काही लोकांनी रॉडही काढले होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Related posts