रशियाचे Luna 25 चंद्रावर क्रॅश होताच वरिष्ठ शास्त्रज्ञ रुग्णालयात दाखल, धसका की आणखी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Luna 25 Moon: भारताचे चांद्रयान-३ (chandrayaan 3) आता अंतिम टप्प्यात आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या अंतिम कक्षेत असून उद्या म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. संपूर्ण देशासह जगाचे लक्ष चांद्रयान-३ मोहिमेकडे लागून राहिले आहे. तर, एकीकडे रशियाचे लूना-25 हे यानही या स्पर्धेत होते. मात्र, दुर्दैवाने अंतिम कक्षेत असतानाच रशियाचे यान क्रॅश झाले होते. लूना 25 (Lune 25) चंद्रावरच क्रॅश झाल्याने रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियाची ही पहिलीच चांद्रमोहिम होती. त्यातच आता रशियातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लुना 25च्या चांद्रमोहिमेतील महत्त्वाचा भाग असलेल्या वैज्ञानिकांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

लूना 25 क्रॅश झाल्यानंतर या मोहिमेवर काम करणाऱ्या रशियाचे प्रमुख भौतिक आणि खगोलशास्त्रज्ञांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या शास्त्रज्ञांचे नाव मिखाइल मारोव असं असून त्यांचे वय ९० वर्ष इतके आहे. त्यांना मॉस्कोयेथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नव्वदी गाठल्यानंतरही रशियाच्या लूना 25 मोहिमेवर खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम पाहत होते. रशियाचे लूना 25 यानाचे चंद्राच्या त्याच भागावर लँडिग होणार होते जिथे भारताचे चांद्रयान-३ उतरणार आहे. 

एका वृत्तपत्रानुसार, 90 वर्षीय मिखाइल मारोव यांची लूना 25 क्रॅश झाल्यानंतर लगेचच तब्येत खालावली होती. मिखाइल यांना यान क्रॅश झाल्याचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांना लगेचच मॉस्कोतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर लुना-25 यान क्रॅश होणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. तो क्षण इतका भयानक होता की  त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. 

मिखाईल मारोव यांनी म्हटलं आहे की, मी आता रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली आहे. मॉस्कोमधील क्रेमलिनजवळील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की हे सर्व खूप कठीण आहे. माझं आयुष्य नकळत या मोहिमेशी जोडले गेले होते. त्यामुळं मी शांत कसा राहू शकतो. मिखाईल यांनी पूर्वी सोव्हिएत अंतराळ मोहिमांवर काम केले होते आणि लूना -25 मोहिम ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. 

मिखाईल यांनी पुढे म्हटलं आहे की, दुर्घटनांची कठोर चौकशी व्हावी तसंच, त्याच्यामागील कारणांचाही शोध घेतला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

Related posts