माहीम किल्ल्याला मिळणार ऐतिहासिक गतवैभव( प्रगत भारत । pragatbharat.com)

माहीम किल्ल्यावरील झोपड्यांची अतिक्रमणे हटविल्यानंतर आता किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामावर मुंबई महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुरातन वास्तुविशारद विकास दिलावरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सागरी आरमाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा माहीम किल्ला एकेकाळी मुंबईच्या समुद्रीमार्गाचा संरक्षक शिलेदार मानला जात होता. एक हजारहून अधिक वर्षांचा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला पाहण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक येतात.
मात्र किल्ल्यावरील झोपड्यांमुळे किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचत होती. तसेच अस्वच्छताही निर्माण झाली होती. त्यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. किल्लेअभ्यासक, पर्यावरणवादी संस्थांनी याबाबत पालिकेचे वारंवार लक्ष वेधल्यानंतर अखेर या किल्ल्यासह मुंबईतील इतर समुद्री किल्ल्यांच्या संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला.

माहीम किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यात किल्ल्यावरील झोपड्या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारणत: १९७०पासून किल्ल्यावर झोपड्यांचे अतिक्रमण सुरू झाले होते. राज्य सरकारच्या सन २०००पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या धोरणानुसार या झोपड्यांचे आधी पर्यायी जागेत पुनर्वसन करण्यात आले.

अन्य बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून संरक्षक कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर किल्ल्याला नवी झळाळी देण्यासह किल्ल्याची पुरातन वास्तू कशी होती, बुरूज, कोट, भिंती, त्यावेळी किल्ल्यात असलेल्या वास्तू या जुन्या काळाप्रमाणेच दिसाव्यात याचा विचार सौंदर्यीकरणात केला जाणार आहे.

किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी दिलावरी यांच्याकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी किल्ल्याचा संपूर्ण अभ्यास केला जाणार आहे.

सौंदर्यीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर माहीम चौपाटी सर्वप्रथम स्वच्छ करण्यात आली आहे. किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाल्यावर येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावरून वांद्रे-वरळी सी-लिंक न्याहाळता येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.


हेही वाचा

मालाडचा पी उत्तर प्रभाग दोन भागात विभागला गेला

मनोरीत खारे पाणी शुद्धीकरण प्रकल्पामुळे नवीन जलस्रोत होणार निर्माण

Related posts