बापरे… सूर्य लाल नाही निळा दिसू लागला! लोकांमध्ये घबराट; Blue Sun मागील गूढ काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

The Sun turned Blue: ब्रिटनमधील लोकांसाठी गुरुवारची सकाळ फारच आश्चर्यकारक ठरली. गुरुवारची सकाळ झाली तेव्हा आकाशातील सूर्य त्यांना रोजपेक्षा फारच वेगळा दिसला. ब्रिटनमधील लोकांना चक्क निळा सूर्य पाहायला मिळाला. त्यामुळेच सोशल मीडियावर ब्लू सनची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसलं. अनेकांनी सोशल मीडियावर या निळ्या सूर्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अनेकजण सूर्य असा का दिसतोय असं म्हणत चिंता व्यक्त केली. मात्र या ब्लू सनचं रहस्यनंतर उलगडलं आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

कोणी काय म्हटलंय?

एका एक्स युजरने (ट्वीटर युजरने), “28 सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंगडममधील हेर्टफोर्डशेअरमध्ये असा सूर्य दिसत होता,” अशी पोस्ट केली आहे. अन्य एकाने, ‘ज्वालामुखीच्या राखेमुळे आज स्कॉटलंडमध्ये निळा सूर्य पाहायला मिळाला,’ असं लिहिलं आहे. आज सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी वरलिंगवर्थमध्ये असा निळा सूर्य दिसला म्हणत अन्य एकानेही फोटो शेअर केला आहे. “या पूर्वी मी निळा सूर्य कधीच पाहिला नव्हता. मला सूर्याचा नारंगी किंवा लाल रंगच ठाऊक आहे. ओलेफियामध्ये 2017 साली संपूर्ण ब्रिटनमध्ये पोर्तुगालमध्ये लागलेल्या वणव्याचा धूर पसरला होता तेव्हा सूर्य अधिक नारंगी आणि लाल दिसत होता. आज हा निळा का दिसतोय?” असा प्रश्न एकाने विचारला आहे.

नक्की कशामुळे घडलं हे?

ब्रिटनमधील हवामान विभागाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. येथील एका वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या पश्चिमेकडील भागामध्ये सध्या दाट धुक्याची समस्या आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिकेतील कॅनडामधील जंगलांमध्ये वणवे पेटत आहेत. या वणव्यांचा धूर ब्रिटनमध्येही पसरला आहे.

अनेकांना पडला प्रश्न

वातावरणातील धूर आणि उंचावर असलेले ढग सूर्याला झाकत आहेत. सूर्याचा प्रकाश या ढग आणि धूरामुळे परावर्तीत होत आहे. त्यामुळे सूर्य निळ्या रंगाचा दिसत आहे. “आज सूर्य निळा का दिसतोय यासंदर्भात अनेकजण प्रश्न विचारत असून यामागे पर्यावरणाचं कारण आहे,” असं या वैऊानिकाने सांगितलं.

‘नासा’चं म्हणणं काय?

कॅनडामधील जंगलांमध्ये पेटलेल्या वणव्यामुळे ब्रिटनमध्येही मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. त्यामुळेच सूर्य प्रकाश थेट पृथ्वीपर्यंत पोहचत नसून सूर्य याच कारणाने निळा दिसत आहे. एग्नेस नावाचं वादळही उत्तर अमेरिकेमधील अटलांटिक महासागरावर निर्माण झाल्याने वाऱ्याच्या वेगावर परिणाम झाल्याची भर यामध्ये पडली आहे. “प्रत्येक रंगाची वेव्हलेंथ वेगवेगळी असते. निळ्या रंगाची वेव्हलेंथ सर्वात कमी म्हणजे 380 नॅनोमीटर आहे. तर लाल रंगाची व्हेवलेंथ सर्वात लांब म्हणजे 700 नॅनोमीटर आहे,” असं अमेरिकी अंतराळ संस्था असलेल्या ‘नासा’ने म्हटलं आहे. धूरामुळे सूर्य प्रकाश वेगळ्याच वेव्हलेंथमध्ये पृथ्वीपर्यंत पोहचत असल्याने सूर्य निळा दिसतोय असं नासाला सूचित करायचं आहे.

Related posts