( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : सिंगापूरमधील (Singapore) एका 37 वर्षीय भारतीय मुख्य पुजार्याला (Indian priest) देशातील सर्वात जुन्या हिंदू मंदिरातून 2 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दागिन्यांचा (ornaments) गैरवापर केल्याबद्दल मंगळवारी भारतीय पुजाऱ्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कंडासामी सेनापती असे या पुजाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. कंडास्वामीवर विश्वासभंगाचे पाच आणि भ्रष्टाचाराचे पाच, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्री मरियम्मन मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या कंडासामी सेनापती यांच्यावर 2016 ते 2020 दरम्यान मंदिरातून सोन्याचे दागिने चोरून दुकानात विकून रोख रक्कम लुटल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने न्यायालयाला सांगितले की, दागिन्यांची किंमत वीस लाख डॉलरपेक्षा जास्त आहे. कांडसामी यांनी यातील अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम ही गुन्हेगारी स्वरुपात देशाबाहेर हस्तांतरित केल्याचेही समोर आले आहे.
कंडास्वामी सेनापती यांची डिसेंबर 2013 पासून 30 मार्च 2020 रोजी पर्यंत डाउनटाउन चायनाटाउन जिल्ह्यातील हिंदू एन्डॉमेंट्स बोर्डाने श्री मरियम्मन मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2014 मध्ये, मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यातील तिजोरीच्या चाव्या सेनापतीला देण्यात आल्या होत्या. यामध्ये मंदिराच्या मालकीचे 255 सोन्याचे दागिने होते. मंदिरातून दागिने काढून घेणे, ते गहाण ठेवणे आणि पैसे असूनही ते सोडवणे अशी कंडास्वामीची चोरीची पद्धत असल्याचे न्यायालयाने सांगितले. पण गेल्या वर्षी जेव्हा कोविड-19 सर्व देशभर पसरला तेव्हा तो काही समारंभांसाठी वेळेत दागिने परत न करु शकल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.
मात्र त्यावेळी कंडास्वामीने गहाण ठेवलेले दागिने सोडवले आणि परत केले. पण कंडास्वामीच्या कामाच्या पद्धतीवर पोलिसांना संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी याआधी गहाण ठेवलेल्या दागिन्यांबाबत कंडास्वामीकडे चौकशी केली. त्यावेळी त्याची चोरी पकडली गेली. जून 2020 च्या लेखापरीक्षणादरम्यान, सेनापतीने मंदिर वित्त संघाच्या सदस्यांची दिशाभूल करत त्याच्याकडे तिजोरीची चावी नाही आणि भारतात चावी विसरला असण्याची शक्यता आहे असे सांगितले. मात्र जेव्हा कर्मचार्यांनी लेखापरीक्षण करण्याचा आग्रह धरला तेव्हा सेनापतीने शेवटी कबुली दिली की आपण हे दागिने घेतल्याचे सांगितले.
सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील साउथ ब्रिज रोडवर असलेल्या श्री मरियम्मन मंदिराने त्यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिराच्या आतील गाभाऱ्यात मुख्य पुजाऱ्याच्या ताब्यात सोन्याचे प्रार्थना दागिने ठेवण्यात आले होते. सोन्याच्या दागिन्यांच्या हिशोबाची खात्री करण्यासाठी नियमित ऑडिट केले जाते, असे मंदिराने सांगितले. मात्र त्यांना कंडास्वामीने केलेल्या चोरीची जराही कल्पना आली नव्हती.
अशी करायचा चोरी
2016 मध्ये सेनापतीने मंदिराती दागिने गहाण ठेवण्यास सुरुवात केली होती. नंतर मंदिरातील इतर दागिने गहाण ठेवून मिळालेल्या पैशाचा वापर करून, आधीच गहाण ठेवलेले दागिने सोडवून आणायचा. फक्त 2016 मध्ये सेनापतीने 172 वेळा मंदिरातील 66 सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते. 2016 ते 2020 या कालावधीत त्याने अनेकवेळा असे प्रकार केले. सेनापती याला 2016 ते 2020 मध्ये 2,328,760 सिंगापुरी डॉलर मिळाले होते. त्यापैकी काही त्यांनी त्यांच्या बँक खात्यात जमा केले आणि सुमारे 141,000 सिंगापुरी डॉलर भारतात पाठवले. दरम्यान, मंदिरातील सदस्यांनी लेखापरीक्षणाचा आग्रह धरल्यानंतर सेनापतीने आपला गुन्हा कबूल केला आणि दागिने गहाण ठेवल्याचे कबूल केले.