( प्रगत भारत । pragatbharat.com)
COVID 19 Sub Variant JN.1 : पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus Updates) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 ने एन्ट्री केली आहे. देशभरात आतापर्यंत 21 प्रकरणांची नोंद झाली असून गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात एक एक रुग्ण आढळले आहेत. JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट (New Sub-Variant of Corona) असून हा नवा व्हेरियंट अमेरिकेत सप्टेंबर पासून जगभरात पसरण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये JN-1 या नव्या व्हेरिएंटमुळे तिघांचा मृत्यू झालाय.
कोरोना झालेल्यांना पुन्हा नव्या व्हेरिएंटचा धोका?
JN 1 व्हेरियंट हा अतिशय वेगाने पसरतोय. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोरोना झालेल्या लोकांवर JN 1 व्हेरियंट हल्ला करु शकतो? कोरोनाची महामारी संपली मात्र कोरोनाने आपल्या पाठलाग सोडलेला नाही. या कोरोनाचे वेगवेगळे नवीन नवीन असे व्हेरियंट येतच राहणार, असं IMA चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी आमच्याशी बोलताना सांगितलंय. डॉ. भोंडवे म्हणतात की, JN 1 व्हेरियंट रुग्णांची आरोग्य विभागाची आकडेवारी पाहता, 43 टक्के रुग्ण असे आहेत, ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. पण अशा रुग्णांमध्ये या व्हेरियंटचे सौम्य लक्षणं आढळली आहेत. हा व्हेरियंट अतिशय वेगाने पसरतो मात्र याची मारक क्षमता खूप कमी आहे. याचा मृत्यूदर अत्यंत कमी आहे, असंही डॉ. भोंडवे म्हणाले.
2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय?
थंडीच्या दिवसात साधारण ऑक्टोबर, सप्टेंबर महिन्यात सर्दी, खोकलाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढतात. त्यात कोरोनाचीही हीच लक्षण असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. JN 1 व्हेरियंटची लक्षणं ही सर्दी, खोकला आणि ताप अशीच आहे. त्यामुळे अशी लक्षण आढळल्यास घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला डॉ. भोंडवे देतात. गरज पडल्यास कोरोनाची चाचणी करु घ्या. त्याशिवाय सर्वसामान्यांनी मास्क वापरावा असंही ते म्हणतात. ज्या लोकांनी कोरोनाचे दोन लस शिवाय बूस्टर डोस घेतला आहेत, त्यांनाही JN 1 व्हेरियंटची लागण होऊ शकते. पण त्यांच्यामध्ये सौम्य परिणाम दिसून येतात. त्यामुळे सरकारने पूर्वीप्रमाणे लसीकरण सुरु करावे, अशी त्यांची मागणी आहे.
सध्या आरोग्य विभागाकडे किती लस आहे याबद्दल अधिकृत माहिती नसली तरीदेखील ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली नाही, ते लोक जेव्हा हॉस्पिटलला लस घेण्यासाठी जातात. त्यांना ती उपलब्ध नाही, अशी उत्तर मिळतात. त्याशिवाय 10 लोकांना एकत्र आणल्यास तुम्हाला ती लस देण्यात येईल, असंही काही हॉस्पिटलमधून लोकांना सांगत येतं आहे, अशी माहितीही त्यांनी आम्हाला दिली.
JN 1 व्हेरियंटचा या लोकांना अधिक धोका!
ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते त्यांना या JN 1 व्हेरियंटचा धोका आहे. त्याशिवाय मधुमेह, हृदयाशी संबंध आजार, उच्चरक्त दाब, क्षयरोग, HIV, टीबी, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना JN 1 व्हेरियंटची लागण होण्याची भीती असते, असं तज्ज्ञांचं मत आहे. या लोकांना JN 1 व्हेरियंटची लागण झाल्यास त्यांचा आजार गंभीर स्वरुप घेऊ शकतं. त्यामुळे JN 1 व्हेरियंटबदद्ल सतर्क राहा कारण पुढे जाऊन JN 1 व्हेरियंट गंभीर रुप धारण करु शकतं, असा इशारा डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.
‘सरकारने ‘या’ गोष्टी त्वरित कराव्यात’
डॉ. भोंडवे म्हणतात की, सरकारने त्वरित ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यांनी पूर्वीप्रमाणे ऑनलाईन लसीसाठी नोंदणी सुरु करावी. लसीकरण केंद्राची व्यवस्था करावी. त्याशिवाय महाराष्ट्रात मास्क सक्ती करावी, असंही त्यांनी मागणी केली आहे.
‘या’ गोष्टी टाळा आणि कोरोनाला दूर ठेवा!
नाताळाच्या सुट्ट्या (Christmas 2023 ) आणि त्यानंतर नवीन वर्षाच्या (Happy New Year 2024) स्वागताची पार्टी (New Year Party) त्यामुळे मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. अशावेळी JN 1 व्हेरियंटचा धोका टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः बंद भागात जाणं टाळा. नाही तर मास्कचा वापर करा. संसर्ग टाळण्यासाठी, सोशल डिस्टंन्स ठेवा आणि वारंवार हात धुवा, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं आहे.