‘…नाहीतर मरायला तयार राहा’; पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला शेवटचा अल्टिमेटम

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Israel Hamas war : इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबवण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या कित्येक दिवसांपासून दोन्ही बाजूकडून संघर्ष सुरु आहे. इतर देशांनी मध्यस्थी करुनही अद्यापही दोन्ही बाजूकडून कोणीही माघार घेतल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे युद्धविराम करारासाठी वाटाघाटी होण्याची शक्यता कमी दिसते. अशातच इस्रायलने हमासला शेवटचा इशारा दिला आहे. आत्मसमर्पण करा, तुमच्याकडे पर्याय नाही असे इस्रायलने म्हटलं आहे.

टाईम्स ऑफ इस्रायलने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, इस्रायलने गाझामधील लढाई कायमची थांबवण्याची हमासची मागणी फेटाळून लावली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाबाबत आपल्या जुन्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. जोपर्यंत हमास पूर्णपणे नष्ट होत नाही आणि ओलीसांची सुरक्षित सुटका होत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही, असे इस्रायलने म्हटलं आहे. हमासला एक सोपा पर्याय देण्यात आला होता  एकतर आत्मसमर्पण करा किंवा मरा. त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा हमासला संपवण्याबाबत भाष्य केलं आहे. इस्रायली संरक्षण दलाने हमासला कोणत्याही किंमतीत संपवण्याचे आपले ध्येय पूर्ण केले पाहिजे, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर नेतान्याहू यांनी दोन्ही बाजूकडील युद्ध थांबवण्याच्या सर्व प्रयत्नांना पुन्हा एकदा मागे ढकललं आहे. इस्रायल आणि हमास हे दोन्ही युद्धविरामावर सहमत नसल्याने दुसऱ्यांदा, ओलिसांशी संबंधित चर्चा फसल्याचे दिसत आहे.

“आम्ही विजयापर्यंत पोहोचत आहोत. जोपर्यंत आम्ही सर्व उद्दिष्टे साध्य करत नाही तोपर्यंत आम्ही युद्ध थांबवणार नाही. हमासचा नाश आणि सर्व ओलीसांची सुटका हे आमचे ध्येय आहे. हमाससमोर अतिशय सोपे पर्याय आहेत. शरण जा अन्यथा मरा. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. हमासचा खात्मा केल्यानंतर गाझा इस्रायलला कधीही धोका देऊ नये यासाठी मी माझी सर्व शक्ती वापरेन,” असे नेतन्याहू यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
 
इजिप्त आणि कतार गाझामधील शांततेसाठी इस्रायल आणि हमासशी स्वतंत्र चर्चा करत असतानाच नेतन्याहू यांचे हे विधान समोर आलं आहे. या करारामुळे 129 ओलिसांची सुटका होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस झालेल्या करारानंतर, हमासने 105 ओलिसांची सुटका केली होती. दुसरीकडे, गाझात झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 134 इस्रायली सैनिक ठार झाले असून सुमारे 740 जखमी झाले आहेत. इस्त्रायली लष्कराच्या हवाल्याने संयुक्त राष्ट्राने ही माहिती दिली आहे. गाझा लढाईत आणखी तीन इस्रायली सैनिक ठार झाले आहेत, त्यात बटालियन 931 मधील 19 वर्षीय सार्जंट आणि 20 आणि 21 वयोगटातील दोन लेफ्टनंट यांचा समावेश आहे, अल जझीराने वृत्त दिले आहे.

Related posts