‘तू कोर्टात काळे कपडे का घालत नाहीस?’, सुकेशने जेलमधून जॅकलीनला पाठवलेले मेसेज आले समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस एकमेकांवर सतत गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सध्या जेलमध्ये असणारा प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला काही व्हॉट्सअप मेसेज पाठवले आहेत. जेलमध्ये असतानाही त्याने बनावट नंबरच्या आधारे हे मेसेज पाठवले आहेत. यामधील एका मेसेजमध्ये सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्रीली कोर्टात सुनावणीदरम्यान काळे कपडे घालण्याचा आग्रह केला होता.

30 जून 2023 रोजी पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये सुकेशने लिहिलं होतं की, “बेबी, या महिन्यात 6 तारखेला आपली कोर्टाची तारीख आहे. जर तुला सुनावणीसाठी हजर केलं तर काळा कुर्ता किंवा काळ्या रंगातील कोणतेही कपडे घाल. जेणेकरून मला तू माझे सर्व संदेश पाहिले आहेत आणि तुझं प्रेम कायम आहे हे मला समजेल. बेबी मला तुझी फार आठवण येत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू कायमची माझी आहेस”. 

पुढे त्यात लिहिण्यात आलं होतं की, “बेबी मला माहित आहे की तुझ्या नावात एक अतिरिक्त ई जोडण्यावरुन ट्रोल केलं जात असल्याने तू नाराज आहेस. पण तू जास्त चिंता करु नकोस. कारण यापैकी कोणीही ट्रोल करणारे लायक लोक नाहीत, तू माझी राजकुमारी आहेस तू रॉकस्टार आहेस… तू सुपरस्टार होणार आहेस”. 

पण या मेसेजनंतर झालेल्या सुनावणीत जॅकलिनने काळे कपडे परिधान न केल्याने सुकेश नाराज झाला होता. त्याने मेसेजमध्ये लिहिलं होतं की, “बेबी, कोर्टात सुनावणीच्या वेळी तू त्या दिवशी काळे कपडे घातले नाहीस हे पाहून खूप वाईट वाटले. बेबी मला खरंच समजत नाही की तू काय विचार करत आहेस. पळून जाणे किंवा मला टाळणे हे योग्य नसून, तुला कोणत्याही प्रकारे मदत करणारं नाही. मी सर्व मार्गांनी तुमच्या पाठीशी असेन. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की मी तुला सर्व मदत करण्यास तयार आहे”.

“पुढील सुनावणीदरम्यान तू कोणत्याही रंगाचा, एकापेक्षा अधिक रंग असणारा कुर्ता घाला. किंवा कोणतंही डिझाईन नसणारा पांढरा शर्ट घाल. जेणेकरुन तू हे मेसेज पाहिले आहेस हे मला समजेल,” असाही संदेश त्याने पाठवला होता. एका मेसेजमध्ये सुकेश चंद्रशेखरने दिग्दर्शक लव्ह रंजन तुला चित्रपटाची ऑफर देईल असा दावा केला. 

“पुढच्या काही आठवड्यांत लव्ह रंजन तुझ्याशी एका चित्रपटासाठी संपर्क साधेल. मी त्याच्याशी करार केला आहे. ही तुझ्यासाठी खूप मोठी संधी असून, माझ्याकडून तुझ्यासाठी भेट आहे. मी तुला एक मेसेज कार्ड पाठवले होते. तुला ते आवडलं असेल आणि पाहिलं असशील अशी आशा आहे,” असंही त्याने एका संदेशात लिहिलं होतं. 

दरम्यान सध्या जॅकलिनने केलेल्या आरोपांमुळे सुकेश चंद्रेशखरनेही तिच्यावर प्रत्यारोप केले आहेत. सुकेशच्या धमक्यापासून संरक्षण मिळावे यासाठी जॅकलीनने अलीकडेच दिल्ली न्यायालयात धाव घेतली. मी निष्पाप बळी आहे असं म्हणत तिने तिच्यावरील खटला रद्द करण्याची मागणीही केली आहे. 

Related posts