दुचाकीच्या चाकावरून घरफोडीतील आरोपीला बेड्या

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – मोईल येथे ३० लाखांची घरफोडी केलेल्या एका चोरट्याला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत दुचाकीच्या चाकावरून पोलिसांनी अटक केली.आमीर शब्बीर शेख (वय २५, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई येथे २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री पावणे दहा वाजताच्या कालावधीत घरफोडी झाली होती. याप्रकरणी नितीन शहाजी कर्पे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून ४७.८ तोळे सोने आणि ५ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३० लाख ४८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक दुचाकी संशयितपणे जाताना दिसली. त्या दुचाकीचे चाक लाल रंगाचे होते. त्यानंतर मोई, निघोजे, कुरुळी परिसरात गस्त घालताना पोलिसांना संशयित दुचाकी दिसली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीसह पळून जाऊ लागला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कर्पे यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आमीर शेख याच्याकडून ४७.८ तोळे सोन्याचे दागिने, तीन लाख रुपये रोख रक्कम आणि दुचाकी जप्त केले आहे.

Related posts