Maharashtracha Favourite Kon : रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू कायम, मिळाले ‘इतके’ पुरस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtracha Favourite Kon : प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वेड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडणाऱ्या या चित्रपटाला तब्बल 9 पुरस्कार मिळाले आहेत. 

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची सिनेसृष्टीत कायमच चर्चा रंगताना दिसते. अखेर हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले. नुकतंच अभिनेता रितेश देशमुखने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

रितेश देशमुखने दिली गुडन्यूज

रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत जिनिलिया आणि रितेशच्या हातात ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यातील ट्रॉफी पाहायला मिळत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत आहे. ‘वेड’ चित्रपटाने एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. त्याबद्दल त्याने एक पोस्ट शेअर करत आभारही व्यक्त केले आहेत. 

रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे : 
सर्वोत्कृष्ट चित्रपट – मुंबई फिल्म कंपनी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – रितेश देशमुख
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जिनिलीया देशमुख
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रितेश देशमुख
सर्वोत्कृष्ट गाणे – सुखं कळले
सर्वोत्कृष्ट गायक – अजय-अतुल (वेड तुझा)
सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल (सुखं कळले)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा – जिनिलिया देशमुख 
स्टाईल आयकॉन ऑफ द इयर – रितेश देशमुख

रितेश देशमुखने या पुरस्कारांची यादी इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये नमूद केली आहे. “किती सुंदर रात्र होती. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ या चित्रपटाला इतके पुरस्कार मिळाले. आम्हाला दिलेल्या या सन्मानाबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत. आम्हाला ज्या ज्या लोकांनी मतं दिली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. झी टॉकीजचेही धन्यवाद. मला हे आयुष्यभर लक्षात राहिल”, असे रितेश देशमुखने म्हटले आहे. 

दरम्यान रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सगळे रेकॉर्ड्स मोडले होते. विशेष म्हणजे या चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटालाही टक्कर दिली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन वर्ष उलटलं असलं तरी याची जादू अद्याप कायम आहे.

Related posts