ICC lifts Sri Lanka Cricket suspension with immediate effect Cricket News In marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. वनडे वर्ल्ड कपनंतर घातलेली बंदी तब्बल 3 महिन्यानंतर उठवण्यात आल्याने श्रीलंका क्रिकेटमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाला (Sri Lanka Cricket) तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं होतं. श्रीलंका संसदेने एकमताने ठराव मंजूर केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला होता. जोपर्यंत ICC श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवत नाही तोपर्यंत श्रीलंकेला ICC च्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असे निर्देश देण्यात आले होते. श्रीलंका क्रिकेट बोर्डात सरकारी हस्तक्षेप वाढल्याने आयसीसीने बंदीचा निर्णय घेतला होता.

क्रिकेट बोर्डाच्या या वाढत्या हस्तक्षेपामुळे आयसीसी नाराज होतं. श्रीलंका क्रिकेटने आयसीसीचा सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे उल्लंघन केलं आहे. श्रीलंका क्रिकेटने त्यांचे सर्व व्यवहार स्वतंत्र्यपणे हाताळायला हवे होते, पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप होत होता असं आयसीसीने म्हटलं होतं. अशातच आता आयसीसीने बंदी उठवली आहे. 

श्रीलंका सरकारचा क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप

श्रीलंका सरकारने 6 ऑक्टोबरला श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) बरखास्त केलं. श्रीलंकेच्या चाहत्यांनी क्रिकेट बोर्डाच्या मुख्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. श्रीलंका सरकारने बोर्ड बरखास्त केल्यानंतर माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम समिती स्थापन करण्यात आली होती.

टी-20 वर्ल्ड कप

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांमध्ये एक ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या 20 संघांमध्ये इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 10 संघांनी थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं.

Related posts