( प्रगत भारत । pragatbharat.com)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए 400 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला. एकटा भाजपा 370 जागा जिंकणार तर मित्रपक्ष 30 हून अधिक जागा जिंकून अबकी बार 400 पारचा आकडा गाठणार असा दावा पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच ‘टाईम्स नाऊ-मॅट्रीझ’चं सर्वेक्षण समोर आलं आहे. महाराष्ट्रासहीत देशभरात घेतलेल्या ओपिनिअन पोलमध्ये यंदाची निवडणूक भाजपासाठी ‘अच्छे दिन’ घेऊन येणार असल्याचं दिसत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाला फटका बसण्याची शक्यता होती तिथं पक्षासाठी साकारात्मक वातावरण दिसत आहे. सध्या आघाड्या, युतीसंदर्भातील बऱ्याच चर्चा आणि निर्णय गुलदस्त्यात असतानाही एनडीएला लोकसभा 2024 मध्ये तब्बल 366 जागा मिळताना दिसत आहेत. तर ‘इंडिया आघाडी’ला 106 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. इतर पक्षांना 73 जागांपर्यंतच मजल मारता येईल असं चित्र दिसत आहे.
या राज्यात 100 टक्के जागा जिंकणार एनडीए
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एनडीएची सोबत केल्याचा फायदा बिहारमध्ये होताना दिसत आहे. गाय पट्ट्यातील या महत्त्वाच्या राज्यात एनडीएला 35 जागा मिळतील असं या सर्वेक्षणात दिसत आहे. तर ‘इंडिया आघाडी’ला बिहारमध्ये केवळ 5 जागांवर समाधान मानवं लागणार असल्याचं ओपिनिअन पोलमध्ये दिसून आलं आहे. उत्तराखंडमध्ये शत प्रतिशत भाजपा निकाल लागेल असा अंदाज आहे. या राज्याल लोकसभेच्या 5 जागा आहेत. भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमध्येही ‘इंडिया आघाडी’ला फारशी चमक दाखवता येणार नाही असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. येथील 29 पैकी केवळ एका जागेवर ‘इंडिया आघाडी’ला यश मिळेल बाकी 28 जागांवर कमळ फुलेलं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्येही अशीच अवस्था असून 4 पैकी 3 जागांवर भाजपा तर एका जागी काँग्रेसचा विजय होईल असा अंदाज आहे.
पंजाबमध्ये काय होणार? दिल्लीचा अंदाज काय सांगतो?
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमुळे कायम चर्चेचा विषय ठरत असलेल्या दिल्लीमध्ये भाजपाला 7 पैकी 7 जागांवर भाजपाचा झेंडा फडकताना दिसत आहे. पंजाबमध्ये मात्र आम आदमी पार्टीचा जोर कायम राहील असं या सर्वेक्षणात दिसत आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या राज्यामधील लोकसभेच्या 13 जागांपैकी आप 5 जागांवर तर भाजप 3 जागांवर निवडून येऊ शकते. तसेच पंजाबमधील 3 जागा काँग्रेस आणि एका जागेवर एसएडीचा विजय होईल, असं आकडेवारी सांगते. हरियाणामध्येही भाजपाचा जोर कायम राहणार आहे. येथील 10 पैकी 9 जागा भाजपा जिंकेल. त्याचप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपासाठी सकारात्मक वातावरण आहे. या ठिकाणी भाजपालाच सगळ्या 25 पैकी 25 जागा मिळतील असं ओपिनिअन पोल सांगतो. असाच निकाल गुजरातमध्ये अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये 26 पैकी 26 जागा भाजपाला मिळताना दिसत आहेत.
बंगालमध्ये कोणाचा दबदबा?
भाजपाला छत्तीसगडमध्ये 11 पैकी 11 जागा मिळतील असा अंदाज आहे. सध्या हेमंत सोरेन यांच्या अटकेमुळे चर्चेत असलेल्या झारखंडमध्येही भाजपाला मोठं यश मिळणार असं दिसत आहे. झारखंडमध्ये 14 पैकी 13 जागा मिळत असल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची जादू कायम राहील असं दिसत आहे. पश्चिम बंगालमधील 42 पैकी 26 जागा तृणमूल काँग्रेस जिंकेल असा अंदाज आहे. त्या खालोखाल भाजपा 15 जागांवर विजय मिळवले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना मिळून एकच जागा जिंकता येईल असा अंदाज आहे.
दक्षिणेत काय होणार?
दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थानिक पक्षांचा आणि ‘इंडिया आघाडी’ आघाडीचा जोर कायम असेल असं दिसत आहे. तामिळनाडूमधील 39 पैकी 36 जागा ‘इंडिया आघाडी’ला मिळतील. या ठिकाणी एआयएडीएमकेला 2 तर भाजपाला एका जागेवर सामाधान मानावलं लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात कोण वरचढ?
आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीला धक्का देणारी आकडेवारी समोर येत आहे. या ओपिनिअन पोलनुसार सध्या राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाला 48 जागांपैकी 39 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ 9 जागांवर विजय मिळेल असं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये युती तसेच आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालेलं नाही. यासंदर्भातील चर्चा आणि बैठकांचं सत्र सुरु आहे. महिन्याभरापूर्वीच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 19 ते 21 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. तर महाविकास आघाडी 26 ते 28 जागांपर्यंत मजल मारेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र महिन्याभरात चित्र पालटल्याचं दिसत आहे.