सामूहिक विवाह सोहळ्यात भलताच प्रकार; चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral News: उत्तरप्रदेशच्या महरागंज जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भावा-बहिणीनेच सामुहिक विवाह सोहळ्यात सात फेरे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत कळताच मोठा गदारोळ माजला आहे. 

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गंत सरकारकडून लग्नानंतर काही रक्कम दिली जाते. तसंच, संसारपयोगी सामानही दिले जाते. यासाठीच मध्यस्थाने भावा-बहिणींनीच एकमेकांशी लग्न केले. हा प्रकार समोर आल्यानंतर क्षेत्र विकास अधिकारी (BDO) यांनी विवाहनंतर देण्यात येणारे संसारोपयोगी सामान पुन्हा परत मागवले आहे. त्याचबरोबर अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या 35 हजार रुपयांच्या रकमेवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, 5 मार्च रोजी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गंत लक्ष्मीपूर ब्लॉकमध्ये 38 जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. यात लक्ष्मीपूर क्षेत्रातील एक तरुणीनेही लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र एका वर्षापूर्वीच या तरुणीचे लग्न झाले होते. तर तिचा पती नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचा. त्यानंतरही मध्यस्थांनी त्या तरुणीला लग्नासाठी तयार केले. तसंच, ज्या मुलासोबत तिचे लग्न लावून देणार होते तो मात्र आलाच नाही. त्यानंतर मध्यस्थांनी अमुदान म्हणून मिळणाऱ्या रकमेसाठी तरुणी आणि तिच्या भावाचेच लग्न लावले, 

लक्ष्मीपुरच्या बीडीओ अमित मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्च रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात एका तरुणीने तिच्याच भावासोबत लग्न केल्याची घटना समोर आली होती. प्राथमिक तपासानंतर तरुणीला दिलेले सर्व सामान परत मागवले आहे. तसंच, अनुदान थांबवण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल. 

जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं

जिल्हाधिकारी अनुनय झा यांनी म्हटलं आहे की, सामूहिक विवाह सोहळ्यात भावा-बहिणीने लग्न केल्याची अद्याप कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाहीये. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. 

झांशीमध्ये झाला होता घोटाळा

याआधी झांशीमध्येही आयोजित मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात असाच प्रकारची घटना समोर आली होती. बुंदेलखंड महाविद्यालयात झालेल्या सामुहिक सोहळ्यात 96 जणांचे लग्न पार पाडले. पण येथे काहींनी सात फेरे घेतलेच नाही तर काहीजणींनी भांगेत सिंदूरच भरला नाही. 

झांशीच्या आधी बलिया येथेही असाच प्रकार घडला होता. सामूहिक विवाह सोहळ्यातील डझनभर जोडपे तर खोटो होते. काहींची आधीच लग्न झाली होती तर काहींना पैसे देण्याचा बहाणा करुन येथे आणण्यात आले होते. 

Related posts