राहुल गांधी महत्वाकांक्षी आईचा पीडित मुलगा; कंगना रणावतची टीका, ‘त्यांना जबरदस्तीने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

LokSabha: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाची हिमालच प्रदेशातील मंडी येथील उमेदवार कंगना रणावत सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. कंगना सध्या काँग्रेसवर सडकून टीका करत असून, गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर सोनिया गांधी यांचा दबाव असून, त्यांना जबरदस्ती राजकारणात आणल्याचं तिने म्हटलं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत तिने काँग्रेसवर टीका केली. 

“राहुल गांधी महत्त्वाकांक्षी आईचे पीडित पुत्र आहेत. आपण 3 इडियट्स चित्रपटात पाहिलं तशीच स्थिती आहे. मुलं हे कुटुंबवादाचे बळी ठरतात. राहुल गांधी यांच्याबाबतही तीच स्थिती आहे,” असं कंगना रणावत म्हणाली आहे. राहुल आणि प्रियांका यांनी राजकारणात राहावं यासाठी त्यांच्या आईकडून त्यांचा छळ सुरु आहे. त्यांना आपलं आयुष्य जगायला दिलं जात नाही असाही दावा तिने केला आहे. 

राहुल गांधींनी वयाची पन्नाशी ओलांडली असतानाही राहुल गांधींना सतत तरुणांचे नेते म्हणून लाँच केलं जात असल्याचा टोलाही तिने लगावला आहे. “मला वाटतं की, त्यांच्यावर फार दबाव असून ते फार एकटे आहेत,” असं तिने म्हटलं आहे.

मंडीची रहिवासी असणारी कंगना पुढे म्हणाली की काँग्रेसच्या वंशजांना इतर काही व्यवसाय करण्याची परवानगी द्यायला हवी होती. अभिनयात त्यांना आपला हात आजमावता आला असता. “राहुल गांधी यांनी काहीतरी वेगळं करायला हवं होतं. अभिनयात त्यांनी आपला हात आजमवायला हवा होता. ते चांगले अभिनेते झाले असते. त्यांची आई जगातील श्रीमंत महिलांपैकी आहे. त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नाही. त्यांचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या अफवा होत्या. पण ते लग्न करत नाही आहेत,” असं कंगनाने सांगितलं. 

दरम्यान कंगनाने काँग्रेसला घोटाळेबाजांचा पक्ष म्हटलं असून, भाजपाशी आपलं नैसर्गिक नातं असल्याचं म्हटलं आहे, तसंच आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानत असल्याचं सांगितलं आहे. “मी मागील 20 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत असून, फार अलिशान आयुष्य जगत होते. मी स्वत:ला नेता म्हणवत नाही. मी फक्त भाजपाची कार्यकर्ता आहे, जिला लोकांची सेवा करायची आहे,” असं कंगनाचं म्हणणं आहे. 

काँग्रेस नेते सुप्रिया श्रीनाते यांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरही तिने प्रतिक्रिया दिली. “हे फार वेदनादायी आहे. आज जेव्हा लोक करिअरसाठी बाहेर पडत आहे, तेव्हा महिलांना स्वत:ला झाकून घ्यायला आणि नीट कपडे घालण्यास सांगितलं जात आहे. महिंलाचं शोषण सुरु असून, तसं होता कामा नये”, असं कंगनाने सांगितलं. 

Related posts