rajasthan news son of police inspectgor killed a man with bat in jaipur

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. आरोपीने या तरुणाला बॅटने जीव जाईपर्यंत मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आलं असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे नेमकी घटना?
आरोपी 23 वर्षांचा असून त्याचं नाव क्षितिज शर्मा असं आहे. क्षितिजचे वडिल इन्स्पेक्टर प्रशांत शर्मा हे राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. प्रशांत शर्मा हे जयपूरमधल्या (Jaipur) रजनी बिहार कॉलनीत आपल्या कुटुंबासह राहातात. बुधवारी सकाळी आरोपी क्षितीज आपल्या स्कूटरने बाहेर गेला होता. घरापासून काही दूर अंतरावर क्षितिज आणि मृत मोहनलाल सिंधी याच्याशी काही कारणावरुन भांडण झालं. हा वाद चांगलाच विकोपाला गेला. 

त्यानंतर क्षितिज आपल्या स्कूटरवरुन घरी आला आणि त्याने घरातून बॅट आणली. घराबाहेर उभ्या असलेल्या मोहनलालवर त्याने बॅटने हल्ला केला. क्षितिजने बॅटने मोहनलालच्या डोक्यावर प्रहार केला. यात मोहनलाल जागीच कोसळला. पण यानंतरही क्षितिजने त्याच्यावर हल्ला सुरुच ठेवला. धक्कादायक म्हणजे हल्ला करताना क्षितिजचे वडिल प्रशांत शर्मा घरीच होते. बाहेर आरडाओरडा ऐकल्याने ते घराबाहेर आले. पण क्षितिजने वडिलांसमोच मोहनलालला मारहाण सुरु ठेवली.

हल्ल्यानंतर क्षितिज फरार
मोहनलाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर क्षितिज, वडिल प्रशांत शर्मा आणि इतरांनी मोहनलालला आपल्या कारमध्ये टाकून रुग्णालयात नेलं. तिथून क्षितिज फरार झाला. उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे मोहनलालचा मृत्यू झाला. स्थानिकांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी आरोपी क्षितिजचा माग काढत त्याला अटक केली.

आरोपी क्षितिजवर कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहनलालचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. क्षितिज आणि मोहलालचं भांडण नेमकं कशामुळे झालं, याचा पोलिस तपास करत आहेत.

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद
मृत मोहनलाल हा जयपूरच्या जगदंबा नगर कॉलनीत राहात होता. मोहनलाल याचा भाजीचा ठेला होता. क्षितिजबरोबर भांडण झाल्यानंतर तो तीन ते चार तास क्षितिजच्या घरासमोरच फिर होता. मोहनलालच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून मृत मोहनलालच्या कुटुंबियांनी आरोपी क्षितिज आणि इन्स्पेक्टर प्रशांत शर्मा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

Related posts