( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोव्याला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरु होताच प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. वंदे भारत कोकणातून जात असल्याने कोकणवासिय प्रचंड आनंदात आहेत. त्यामुळेच मुंबई-मडगाव (Mumbai Madgaon Vande Bharat Express) वंदे भारत सुरु होताच एक्स्प्रेस फुल झाली होती. दरम्यान, यानंतर आता रेल्वेने वंदे भारतमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई ते गोवा अंतर 586 किमी असून वंदे भारतने प्रवास करण्यासाठी 8 तासांचा वेळ लागतो. पण पावसाळ्यात ही वेळ दोन तासांनी वाढते. त्यामुळे मुंबईहून गोव्याला पोहोचण्यासाठी 10 तास लागतात. मात्र इतर ट्रेनच्या तुलनेत प्रवाशांचे 2 ते 3 तास वाचत आहेत.
वंदे भारतमध्ये प्रवाशांच्या सर्व सोयी सुविधांचा विचार करण्यात आला असून, त्याप्रमाणे सर्व नियोजन करण्यात आलं आहे. आसन व्यवस्था ते जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वंदे भारतचं कौतुक केलं जात आहे. पण मुंबई ते गोवा हे 10 तासांचं अंतर पार करताना प्रवाशांना सलग बसून प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना कंटाळा येत असून, त्यांना व्यवस्थित आराम करण्याची संधी मिळत नाही. यामुळे आता रेल्वे मुंबई-गोवा वंदे भारतमध्ये स्लीपर कोच जोडण्याचं नियोजन आखत आहे. यामुळे प्रवासी आता निसर्गाचा आनंद घेण्यासह आरामही करु शकतात.
गोवा या दोन ठिकाणांना अत्यंत जलद गतीने जोडण्याचे काम वंदे भारत एक्स्प्रेसने केले आहे. कोकण आणि गोव्यातील समुद्र किनारे, हिरवीगार झाडी बघायला जाण्यासाठी प्रवासी वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती देत आहेत. तसेच, एक्स्प्रेसच्या मोठय़ा तावदानाच्या खिडक्यांतून सह्याद्रीचे निसर्गरम्य दृश्य प्रवाशांना अनुभवता येत आहे. परंतु, वंदे भारतमधील आसन श्रेणीमुळे प्रवाशांचा 10 तासांचा प्रवास कंटाळवाणा होत आहे. त्यामुळे लवकरच वंदे भारतमधील आसन श्रेणीत बदल करून शयनयान डबे जोडण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वे मंडळाकडून नियोजन सुरू आहे.
चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी करण्यात आली आहे. वेगवान प्रवासाच्या दृष्टीने वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्यात आली आहे. कमी तास आणि कमी अंतरासाठी तयार करण्यात आलेल्या या एक्प्रेसमध्ये आसन श्रेणीची व्यवस्था आहे. यामध्ये दोन प्रकारच्या आसन व्यवस्था आहेत. पण दूरचा प्रवास असताना सुरुवातीला आरामदायी वाटणारी ही आसनव्यवस्था काही वेळाने मात्र प्रवाशांना त्रासदायक वाटू लागते.
प्रवाशांना पाठ टेकवायची इच्छा असल्यास आसन मागे झुकवण्याची व्यवस्था आहे. मात्र त्या अवस्थेत व्यवस्थित आराम करायला मिळत नसल्याच्या काही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच रेल्वे मंडळाने आता आयसीएफला स्लीपर कोच असणाऱ्या वंदे भारतची निर्मिती करण्याची सूचना केली आहे. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेस डिसेंबर अखेरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हे डबे टप्प्याटप्याने जोडण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. तसंच यानंतरदोन शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस मार्गाचे अंतर 550 किमीहून अधिक असेल.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला स्लीपर कोच डबे जोडण्याची घोषणा केली आहे. रेल्वे त्यासंबंधी नियोजन आखत आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला भविष्यात स्लीपर कोच जोडण्यात येतील.