‘भारत’ बरोबरच 10 नावांवर चर्चा, उद्धव ठाकरेंचा ‘तो’ सल्ला; विरोधकांनी INDIA नावं कसं ठरवलं? बैठकीमधील तपशील समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How Opposition Parties Decided To Name Alliance As INDIA: भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA च्या विरोधात 26 पक्षांनी एकत्र येऊन विरोधीपक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या गटाला I.N.D.I.A. असं नाव देण्यात आलं आहे. बेंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधीपक्षांच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र इतक्या पक्षांनी एकत्र येऊन एक नाव निश्चित करणं हे कठीण काम कशापद्धतीने साध्य करण्यात आलं. या नावाचा प्रस्ताव कोणी दिला, इतर कोणत्या नावांची चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आली आहे.

विरोधीपक्षांच्या आघाडीचं नाव काय असावं यासंदर्भात चर्चा करताना जवळपास 10 नावांची चर्चा झाली. त्यानंतर I.N.D.I.A. नाव निश्चित करण्यात आलं. मात्र या नावाबद्दलही अनेकांना शंका होती. हा संघर्ष I.N.D.I.A. विरुद्ध भारत असा होण्याची शक्यताही काही नेत्यांनी व्यक्त केली. 

I.N.D.I.A. बरोबरच कोणत्या नावांची चर्चा?

या बैठकीमधील नावांसंदर्भातील चर्चेबद्दलची माहिती देताना एका ज्येष्ठ नेत्याने I.N.D.I.A. च्या आधी अनेक नावांवर चर्चा झाली. यामध्ये युपीएल म्हणजेच यूनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स या मूळ नावाशी संबंधित इंडियन प्रोग्रेसिव्ह अलायन्स, प्रोग्रेसिव्ह पीपल्स अलायन्स, इंडियन पीपल्स फ्रण्ट, पीपल्स अलायन्स फॉर इंडिया आणि भारत जोडो अलायन्स यासारख्या नावांची चर्चा झाली. 

उद्धव ठाकरेंचा सल्ला

या चर्चेदरम्यान एका नेत्याने ‘भारत’ नाव ठेवण्याचाही सल्ला दिला. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सल्ल्याबद्दल बोलताना अशीही शंका उपस्थित केली की हे नावं दिल्यास संपूर्ण वाद हा इंडिया विरुद्ध भारत असा होऊन जाईल. त्यामुळे केवल भारत नाव न ठेवता यात एखाद्या हिंदी शब्दाचाही समावेश करावा असं उद्धव यांनी सुचवलं.

नीतीश यांचा होता विरोध पण…

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमारसुद्धा I.N.D.I.A. नावाबद्दल फारसे सकारात्मक नव्हते. त्यांनी I.N.D.I.A.N नाव सुचवलं होतं. मात्र हे नाव थोडं संभ्रम निर्माण करणारं ठरु शकतं असं अनेकांचं म्हणणं पडलं. मात्र नंतर लालू प्रसाद यादव नीतीश कुमार यांचं मत बदलण्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी I.N.D.I.A. हे नाव ठेवण्यास होकार दिला. नाव निश्चित झाल्यानंतर ‘लडेगा भारत, जीतेगा भारत’, ही हिंदी टॅगलाइन ठरवण्यात आली.

I.N.D.I.A. पहिल्यांदा कोणी सुचवलं?

विरोधीपक्षांच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी सर्वात आधी I.N.D.I.A. नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी ही कल्पना उचलून धरली. मोदी इंडियाविरुद्ध कसे लढणार असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला. इंडिया विरुद्ध भाजपा असं योग्य ठरेल कारण आपण देशातील लोकांसाठी लढत आहोत, असं मत राहुल गांधींनी मांडलं. 

I.N.D.I.A. नाव ठेवलं तर…; राहुल गांधींनी मांडलं मत

I.N.D.I.A. नावावर बैठकीच्या पहिल्या दिवशीही चर्चा झाली होती. त्यावेळेस राहुल गांधींनी या नावाबद्दल इतर नेत्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी इंडिया नाव ठेवल्यास देशातील जनता आपल्या एकजुटीच्या केंद्रस्थानी राहील असं सांगितलं. 

कमी बोलण्याचा लालूंचा सल्ला

या बैठकीच्या पहिल्या दिवशी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी काही नेत्यांना खोचक सल्ला दिला. थेट काही नेत्यांची नाव घेऊन प्रसारमाध्यमांसमोर कमी बोला असं लालू यांनी सांगितलं. लालू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी फार चर्चा करु नये असं सुचवलं. सतत प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्याने एकत्र येण्याच्या प्रयत्नांना फटका बसण्याची शक्यता निर्माण होते असं लालू म्हणाले. परस्परांमधील मतभेद विसरुन एकत्र येत निवडणूक लढण्याचा सल्ला लालू प्रसाद यादव यांनी दिला.

जागांचं वाटप कसं होणार?

लालू प्रसाद यादव यांनी अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 80 जागांचं वाटप कसं होणार याचा विचार करण्याचा सल्ला दिला. लालू यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जागावाटपाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा असं सुचवलं. कोणता पक्ष कोणत्या राज्यात किती सक्षम आहे याचा विचार करुन जागा वाटप करावं असं केजरीवाल म्हणाले. 

Related posts