( प्रगत भारत । pragatbharat.com)
Hides 5 lakh Rupees: तुम्ही असं पाहिलं असेल, ज्यात घरची महिला नवऱ्याच्या नकळत पैसे बाजूला काढून ठेवते. घरात जेव्हा पैशांची अत्यंत गरज असते तेव्हा तिच्याकडचे साठवलेले पैसे कामी येतात. अनेकदा महिलांकडे एमर्जन्सी फंड तयार असतो. एका महिलेनेदेखील असेच केले होते. पण ती जेव्हा साठवलेली रक्कम पाहायला गेली तेव्हा तिला जबर धक्का बसला. नक्की काय झालं? हे जाणून घेऊया.
तुम्ही देखील तुमच्या आजी आजोबांना पैसे लपवून ठेवताना पाहिले असेल. पण मलेशियामधील वयस्कर महिलेसोबत भलताच धक्कादायक प्रकार घडला. खैरुल अजहर केलांटन येथे ही आजी राहते. तिला पुढे जाऊन धार्मिक स्थळांची यात्रा करायची होती. यासाठी ती पैशाची मोजदाद करत होती.
2024 मध्ये मक्का या धार्मिक यात्रेसाठी तिला जायचे होते. यासाठी तिने 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा करुन ठेवली होती. चुकलं इथेच की, तिने ही रक्कम बॅंकेत न ठेवता घरातच एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवली होती. पण तिने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा समोरचा प्रकार पाहून तिला मोठा धक्का बसला.
तिला या बॉक्समधये नोटा नाहीत तर रद्दीचे तुकडे दिसले. नोटा अनेक दिवस एकाच ठिकाणी राहिल्यांना त्यांना किड पकडली होती. आपल्या आयुष्यभराच्या कमाईला अशी किड लागलेली पाहून वृद्ध महिलेला रडू कोसळले. काय करु? कोणाला सांगू? असे तिला झाले होते.
वृद्ध महिलेच्या नातवाला हा प्रकार कळाला. नातवाने आजीचे पैसे बदलण्यासाठी बॅंकेत जमा केले. त्यानंतर त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट लिहिली. कदाचित मक्का जाणे हे तिच्या नशिबात नसावं, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले.
ही पोस्ट 650 जणांनी शेअर केली असून यावर 260 पेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत. यातील बहुतांश लोकांनी तिच्याबद्दल सहानभुती दाखवली आहे. काही जणांनी आजीबाईला चोरीचे पैसे लपवून ठेवल्याची टिका केली. तर काहींनी पैसे लपवण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करायला हवी होती, असा सल्ला दिला.